'या' झाडावर कपडे बांधले की मुलं सापडतात? खरं की काय?
आपल्याकडे जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमेला स्त्रिया वटवृक्षाला धागा गुंडाळवून त्याभोवती फेऱ्या मारतात. याबाबत आपल्या सर्वांनाच माहिती असेल, परंतु तुम्ही कधी झाडाला कपडे बांधल्याचं ऐकलंय का? मध्यप्रदेशातील लोक असं करतात. झाडाला कपडे बांधल्याने हरवलेली व्यक्ती सापडते अशी मध्यप्रदेशच्या दतिया शहरात मान्यता आहे. शिवाय त्यासाठी एका ठराविक झाडालाच कपडे बांधले जातात. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया. मध्यप्रदेशातील दतिया शहरात असलेलं पंडोखर सरकार मंदिर आज संपूर्ण देशाचं श्रद्धास्थान बनलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या इच्छा घेऊन या मंदिरात दाखल होतात. त्याचबरोबर याठिकाणी बहुतांश मंदिरांमध्ये भक्त पिंपळाच्या झाडाला रक्षाकवच बांधून नवस मागतात.
तर, विशेष म्हणजे पंडोखर सरकार मंदिर परिसरात एक असं कडूलिंबाचं झाड आहे, जिथे लोक रक्षाकवच किंवा एखादा धागा नाही, तर चक्क कपडे बांधतात. कुटुंबातील एखादा सदस्य किंवा विशेषत: लहान मूल हरवलं असेल, तर त्याचे कपडे या कडूलिंबाच्या झाडावर बांधल्यास तो लवकर सापडतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या झाडावर अनेक कपडे बांधलेले दिसतात. त्यामध्ये लहान मुलांच्या कपड्यांची संख्या जास्त असते. येथे आलेल्या एका भाविकाने सांगितलं की, माझ्या नातेवाईकाचा मुलगा हरवला होता. बराच शोध घेतल्यानंतरही मुलगा काही सापडेना. नातेवाईक खूप चिंतेत होते. त्यावेळी या झाडावर त्याचे कपडे बांधण्यात आले.
त्यानंतर अवघ्या 48 तासांत मुलगा सापडला.
दरम्यान, पंडोखर सरकार मंदिराचे पुजारी श्यामजी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर स्थापन झाल्यापासून येथे हे कडूलिंबाचं झाड आहे. लोक त्याला 'नीमवाले बाबा' म्हणतात. जर एखाद्या कुटुंबातील कोणता सदस्य हरवला असेल आणि तो जिवंत असेल तर येथे त्याचे कपडे बांधून ती व्यक्ती नक्कीच सापडते. याठिकाणी काही प्रार्थना करावी लागत नाही, केवळ हरवलेल्या व्यक्तीचे कपडे बांधायचे असतात. मग पंडोखर सरकारच्या कृपेने ती व्यक्ती सापडते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सांगली दर्पण त्याची हमी देत नाही.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.