पंचतारांकित हॉटेल, ६०३ दिवस राहिला अन् ५८ लाखांचे बिल; रोझेट हॉटेलची झाली फसवणूक
नवी दिल्ली : खोटारडेपणाचे किस्से तुम्ही ऐकलेच असतील. पण दिल्लीतील एका हॉटेलमध्ये जे प्रकरण समोर आले आहे ते धक्कादायक आहे. दिल्लीचा रहिवासी असलेला अंकुश दत्ता ६०३ दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतो आणि पैसे न देता चकवा मारतो. नंतर हॉटेल व्यवस्थापनाला माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. या व्यक्तीने हॉटेलची 58 लाखांची फसवणूक केली आहे. आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. हॉटेलचे काही कर्मचारीही दत्ता यांच्याशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तळाशी जाऊन तपास करत आहेत.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (आयजीआय) एरोसिटी येथे असलेल्या हॉटेल रोजिएट हाऊसने याप्रकरणी आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोजिएट हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकृत प्रतिनिधी विनोद मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अंकुश दत्ता नावाच्या व्यक्तीने त्यांच्या हॉटेलमध्ये तब्बल 603 दिवस मुक्काम केला, ज्याचे भाडे 58 लाख रुपये झाले होते, परंतु तो पैसे न देता हॉटेल सोडून गेला, असा आरोप करण्यात आला आहे.
हॉटेलच्या 'फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट'चे प्रमुख प्रेम प्रकाश याने नियमांचे उल्लंघन करून दत्ता याला हॉटेलमध्ये बराच काळ राहण्याची परवानगी दिल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तक्रारीतील माहितीनुसार प्रकाशला हॉटेलमधील खोलीचे भाडे ठरवण्याचा अधिकार होता, तसेच हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या बिलाची माहिती ठेवणाऱ्या संगणक प्रणालीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकारदेखील होता. प्रकाशला दत्ता याच्याकडून काही रोख रक्कम मिळाली असावी असा संशय हॉटेल व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. शिवाय हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणालीशी प्रकाशने छेडछाड करून दत्ता याचा मुक्काम वाढवण्यास मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, "अंकुश दत्ताने चुकीच्या मार्गाने हॉटेलमध्ये राहण्यासाठी, प्रेम प्रकाशसह काही हॉटेल कर्मचार्यांच्या साह्याने प्लॅन केला." हॉटेलने दावा केला आहे की, दत्ता याने 30 मे २2019 रोजी एका रात्रीसाठी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. शिवाय त्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे 2019 रोजी हॉटेल सोडायचे होते, परंतु तो 22 जानेवारी 2021 पर्यंत तिथेच राहिला. हॉटेल व्यवस्थापानाने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असून, खात्यांमध्ये छेडछाड करून विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आयजीआय पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.