Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घातवार ! मुंबईच्या साई भक्तावर काळाचा घाला; 3 अपघातात 7 ठार तर 6 गंभीर जखमी

घातवार ! मुंबईच्या साई भक्तावर काळाचा घाला; 3 अपघातात 7 ठार तर 6 गंभीर जखमी


टाकळी ढोकेश्वरवरून नगरकडे जाणाऱया इर्टिगा कारला समोरून येणाऱया टेम्पोने धडक दिल्याने तीनजण जागीच ठार, तर इतर सहा प्रवासी जखमी झाले. नगर-कल्याण मार्गावर धोत्रे (पारनेर) शिवारात शनिवारी सकाळी हा अपघात झाला.

वेदान्त धनंजय भावसार, प्रीती धनंजय भावसार (रा. कांदिवली, मुंबई) या सख्ख्या बहीण-भावासह वाहनचालक रोशन संजय सुरासे (रा. अंबड, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, जान्हवी अजय भावसार, अर्पिता धनंजय भावसार, हृषीकेश अजय भावसार, धनंजय लुकडू भावसार, जयेश प्रशांत भावसार, ओम प्रशांत भावसार हे गंभीर जखमी झाले. या अपघातात होंडा अमेझचे चालक संजय केशवराव रेवतकर (रा. सैदापूर, कराड, जि. सातारा) हे अपघातात जखमी झाले. जखमींना नगर व टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकुर यांनी माहिती दिली. कांदिवली (पूर्व )येथील भावसार कुटुंबातील नऊ सदस्य इर्टिगा कारमधून नगरला चालले होते. सकाळी टाकळी ढोकेश्वर बाह्यवळण रस्त्यावर धोत्रे शिवारात स्कूलबसला ओव्हरटेक करून आलेल्या भरधाव आयशर टेम्पोने इर्टिगाला धडक दिली, तर इर्टिगा मागे जाऊन होंडा अमेझला धडकली. टेम्पो रस्त्याकडेला पलटी झाला. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला.


अपघातानंतर धोत्रे शिवारातील ग्रामस्थांनी जखमींना मदत केली. दरम्यान, टाकळी ढोकेश्वर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकुर, मच्छिंद्र खेमनर, ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह ग्रामस्थ अण्णा भांड, राजू रोडे, रंगनाथ भांड, अण्णा फाटक, बंटी मिडगे, विलास रोकडे, बाबासाहेब भांड, सुभाष रोडे, दत्ता सासवडे, दत्ता भांड आदींनी मदतकार्य करून जखमींना उपचारांसाठी नगर येथे पाठविले. यासंदर्भात संजय केशवराव रेवतकर (रा. कराड) यांच्या जबाबावरून टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साईदर्शनापूर्वीच काळाचा घाला

* धनंजय भावसार यांचे नगर येथील साडू संदीप रामचंद्र पतंगे यांची भेट घेऊन भावसार कुटुंब शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेणार होते. मात्र, साडूच्या घरी पोहोचण्यापूर्वीच या कुटुंबावर काळाने
घाला घातला.

जेसीबीने कारचे दरवाजे उघडले

* अपघातस्थळावरील दृश्य हृदयद्रावक होते. अपघातात इर्टिगा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यात मृतदेह व जखमी अडकले होते. जेसीबीने ओढून कारचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले.

जतमध्ये कार खड्डय़ात कोसळून दोन ठार

कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खड्डय़ात कोसळून दोघेजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना येळवी-जत राज्यमार्गावर घोलेश्वर हॉटेलनजीक शनिवारी (दि.3) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुखदेव बिरा खरात (वय 34), दगडू शंकर करांडे (35) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे असून, बापू धोंडीबा शिंदे (वय 38) हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी सांगली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, घटनेने हाबसेवाडी (ता. सांगोला) येथे शोककळा पसरली आहे.

सुखदेव खरात यांची पत्नी आजारी असल्याने तिघे मित्र कारने जतला जाणार होते. दरम्यान, ते हाबसेवाडीकडे दुपारनंतर परतणार होते, त्यामुळे जतला गेले नाहीत. रस्त्यातून ते परत गावाकडे जात असताना, घोलेश्वर फाटय़ापासून थोडय़ा अंतरावर आले असता, वेगाने गाडी चालू होती. यावेळी अचानक चालू गाडीची चावी निघाल्याने स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली खड्डय़ात कोसळली. अपघात इतका भीषण होता की, अपघातात गाडी चक्काचूर झाली. यावेळी जतला जाणाऱया एसटी बसेसमधील प्रवासी व वाहनचालक यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी सुखदेव खरात आणि दगडू कारंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर बापू शिंदे हे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जत येथे रुग्णालयात दाखल केले आहे. गंभीर जखमी असल्याने सांगली येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

कारने दुचाकीला तीन किलोमीटर फरफटत नेले

दुचाकीवरून घरी परत जाणाऱया व्यक्तीला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कबनूर येथील संजय शेळके गंभीर जखमी झाले. त्यानंतर लोकांच्या भीतीने कारचालकाने गाडीखाली अडकलेल्या दुचाकीला तीन किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना सांगली-कोल्हापूर महामार्गावर हालोंडी येथे घडली. याप्रकरणी शिरोली पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

जयवंत नामदेव वानखेडे असे अटकेतील कारचालकाचे नाव आहे. संजय विलास शेळके (वय 45, रा. कबनूर, ता. हातकणंगले) असे जखमीचे नाव आहे. संजय शेळके हे दुचाकीवरून शुक्रवारी रात्री शिरोलीहून कबनूरकडे जात होते. ते कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गावरील देवगिरी पेट्रोल पंपासमोर आले असता, कोल्हापूरहून कवठेमहांकाळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱया कारने दुचाकीस्वारास पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील शेळके बाजूला फेकले गेले; पण त्यांची दुचाकी कारच्या पुढे अडकली.

लोक मारतील, या भीतीपोटी कारचालक जयवंत वानखेडे याने दुचाकीला जवळपास तीन किलोमीटर फरपटत नेले. ही घटना पाहणाऱया दुचाकीस्वारांनी या कारचा पाठलाग करत हेरले गावाजवळील हॉटेल समर्थ येथे वाहने आडवी मारून थांबवले. दरम्यान, शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले. त्यांनी कारचालक वानखेडे याला ताब्यात घेतले.

डंपरने ठोकरल्याने दोन महिला ठार

तळेहिप्परगाजवळ डंपरच्या धडकेमुळे दोन महिला जागीच ठार झाल्या, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद सिव्हील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शरीफा असिफ शेख (वय 35), सलीमा बशीर चौधरी (वय 50) अशी अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. तर असिख अमिन शेख (सर्व रा. तळेहिप्परगा) असे जखमीचे नाव आहे. शरीफा, सलीमा आणि असिफ हे तिघे दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या डंपरने धडक दिली. यामध्ये शरीफा आणि सलीमा या जागीच ठार झाल्या, तर असिफ हा गंभीर जखमी झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.