महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांतच खर्च होतो सगळा पगार, 75 टक्के भारतीयांकडे इमर्जन्सीसाठी पैसेच नाहीत
नवी दिल्ली: बचत म्हणजेच सेव्हिंग आणि सामाजिक सुरक्षा या दोन्ही मुद्द्यांबाबत भारतीयांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एका पाहणीत असं समोर आलं आहे की 75 टक्के भारतीयांकडे इमर्जन्सी म्हणजे आपातकालीन स्थितीसाठी पैसेच शिल्लक नसतात. अचानक जर एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरुन काढून टाकलं तर त्या महिन्याचा घराचा हप्ता कसा भरायचा असा प्रश्न त्याच्यापुढं असतो.
या सर्वेत हे समोर आलं आहे की, 3 पैकी एक भारतीय असा आहे की त्याच्याकडे ना हेल्थ कव्हर आहे ना, आपतकालीन स्थितीत गरज लागली तर इमर्जन्सी फंड त्याच्या खात्यात आहे. यात महत्त्वाची बाब ही आहे की 29 टक्के भारतीयांनी सांगितलं की, पगार झाल्यानंतर 15 दिवसांत त्यांचा सगळा पगार खर्च होऊन जातो. महिनाखेरीस मोठे खर्च आले तर भागवायचं कसं असा प्रश्न त्याच्यापुढं उभा राहतो. 25 टक्के भारतीय असे आहेत की त्यांच्याकडे आपत्कालीन स्थितीत इमर्जन्सी निधी उपलब्ध आहे.
लाँग टर्मची तयारी, शॉर्ट टर्मचं काय ?
रिटायरमेंटनंतरचं प्लॅनिंग, मुलांचं शिक्षण, लग्न, वृद्धापकाळातील आरोग्यासाठी लागणारे खर्च याबाबतच्या दीर्घकालीन योजनांचा विचार नागरिक करतात. मात्र लागलीच एखादी निकड आली, आजारपण आलं तर त्यासाठी लागणारा निधी उभा कुठून करायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढं असतो. अचानक नोकरी जाणं, कोरोनाकाळात हॉस्पिटल्सचा वाढलेला खर्चच या सगळ्यावर मात करताना सामान्य भारतीय पगारी नागरिकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचं स्पष्ट झालंय.
इमर्जन्सी फंड म्हणजे काय?
इमर्जन्सी फंड उभा करण्यात भारतीय नागरिक मागे आहे असं मानण्यात येतंय. इमर्जन्सी फंड म्हणजे अचानक उद्भवलेल्या घटनेवर मात करण्यासाठी ठेवण्यात आलेला निधी. सामाजिक सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयातही भारतीय मागे आहेत. नोकरदार वर्गाच्या पगाराचा मोठा भाग हा घर चालवण्यात खर्च होऊन जातो. अशा स्थितीत सेव्हिंगच्या पातळीवर अनेक अडचणींचा सामना त्याला आणि कुटुंबाला करावा लागतो. घर विकत घेतलल्या पगारदारांच्या मागे तर महिन्याचा हप्ता हा सर्वात मोठा काळजीचा विषय असतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.