Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

14 औषधांवर बंदी; पॅरासिटॉमॉलसह कोडीन सिरपचाही समावेश, 'ही' औषधे आरोग्यासाठी घातक

14 औषधांवर बंदी; पॅरासिटॉमॉलसह कोडीन सिरपचाही समावेश, 'ही' औषधे आरोग्यासाठी घातक


केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 औषधांवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीआय  म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी केंद्र सरकारकडे यासंदर्भात अहवाल दिला होता. यामध्ये 14 औषधांच्या उपचारांचा परिणाम आणि उपयुक्तता याबाबत स्पष्टता नसल्याचं सांगितलं होतं. ही औषधे धोकादायक ठरू शकतात, असं सांगत तज्ज्ञ समितीने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

ताप, डोकेदुखी, मायग्रेनवरील 'या' औषधांवर बंदी

आता केंद्र सरकारने 3 जून रोजी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवाल दिल्यानंतर सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. एका गोळी किंवा औषधामध्ये एकापेक्षा जास्त घटक एकत्र असल्यास, अशा औषधांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधे म्हणतात. या औषधांना कॉकटेल औषधे असंही म्हटलं जातं.

त्वरीत आराम देणारी औषधे आरोग्यासाठी धोकादायक

केंद्र सरकारने रुग्णांना आजारापासून त्वरीत आराम देणाऱ्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. यामध्ये पॅरासिटामॉल आणि निमेसुलाइड यांसारख्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणार्या औषधांचा समावेश आहे. ही औषधे लगेच आराम देतात पण यामुळे आरोग्याचं नुकसान होण्याचा धोका जास्त आहे.

केंद्र सरकारकडून 14 औषधांवर बंदी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या औषधांवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे. सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ सल्लागार समितीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपला अहवाल सादर केला होता. या औषधांचे कोणतेही वैद्यकीय औचित्य नसल्याचे सांगण्यात आले. ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे आहेत.

'या' औषधांवर बंदी

निमेसुलाइड + पॅरासिटामॉल

क्लोरफॅनिरामाइन + कोडीन सिरप

फॉल्कोडाइन + प्रोमॅथाजीन

एमॉक्सिसिलिन + ब्रॉमहेक्सिन

ब्रॉमहेक्सिन + डॅक्सट्रोमेथॉर्फन + अमोनियम क्लोराइड मेंथॉल

पॅरासिटामोल + ब्रॉमहेक्सिन फॅनिलेफ्राइन + क्लोरफेनिरामाइन + गुइफॅनेसिन

सालबुटामॉल + क्लोरफॅनिरामाइन

'ही' औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक

तज्ज्ञ समितीने अहवालामध्ये म्हटले आहे की, या एफडीसी औषधांच्या उपचाराबाबत कोणतेही वैद्यकीय पुरावे समोर आलेले नाहीत आणि ही औषधे मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी, या 14 FDC औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरण प्रतिबंधित करणं आवश्यक आहे. ही बंदी 940 ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम 26A अंतर्गत लागू करण्यात आली आहे.

FDC औषधे काय आहेत?

दोन किंवा अधिक औषधे मिसळून तयार केलेल्या औषधांना FDC म्हणतात. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हटलं जातं. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवाला सांगितलं की, ही औषधे वैज्ञानिक माहितीशिवाय रुग्णांना सर्रास विकली जात आहेत. त्यावेळी सरकारने 344 औषधांच्या कॉम्बिनेशनच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. आता सरकारने याच यादीतील 14 औषधांवर नव्याने बंदी घातली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.