Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रत्नागिरी येथे दक्षिण भारत जैन सभेचे 101 वे नैमित्तिक अधिवेशन संपन्न

रत्नागिरी येथे दक्षिण भारत जैन सभेचे 101 वे नैमित्तिक अधिवेशन संपन्न


सांगली : दक्षिण भारत जैन सभेचे 101 वे नैमित्तिक अधिवेशन रत्नागिरी येथे दि.4 जून रोजी संपन्न झाले. भ. शांतिनाथ जिनमंदिर, मराठा भवन येथे दोन सत्रात संपन्न झालेल्या या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी केंद्रीय उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील होते.

कोकण विभागाचे महामंत्री श्री. अजित शिराळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले. मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केल्यानंतर केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी नोटीस वाचन केले. डॉ. अजित पाटील यांनी प्रोसिडींग वाचन करून सभेच्या स्थावर मालमत्ता विक्री किंवा हस्तातरण हा विषय मांडला.  चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर केला. खजिनदार श्री. संजय शेटे यांनी जमाखर्च, आय-व्यय व ताळेबंद सादर केला. बहुसंख्येने उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना मंजूरी दिली.

द्वितीय सत्रात सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रगति आणि जिनविजयच्या शिष्यवृत्ती वितरण या विशेषांकाचे प्रकाशन  व श्रीमतीबाई कळंत्रे जैन श्राविकाश्रमच्यावतीने काढण्यात येणाऱ्या भेट वस्तू योजनेच्या फलकाचे विमोचन यावेळी झाले. यानंतर सभेचे कोकण विभागातील पदाधिकारी आणि या विभागामध्ये  धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यानंतर डॉ. अजित पाटील यांनी सभेचा इतिहास व कार्याचा आढावा घेतला, जैन महिला परिषदेच्या चेअरमन सौ. स्वरूपा पाटील (यड्रावकर) यांनी जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ आणि सभेच्या विविध जैन श्राविकाश्रमच्या उपक्रमांची माहिती दिली.  सहखजिनदार अरविंद मजलेकर यांनी वीर सेवा दल, पाठशाळा, हायस्कूल आणि पतसंस्थेच्या एकूण कार्याचा आढावा घेतला.  खजिनदार संजय शेटे यांनी सभेच्या शाखा, आर्थिक नियोजन आणि स्थावर मालमत्तेचा तर चेअरमन रावसाहेब जि. पाटील यांनी शिष्यवृत्ती व जीवन संजिवनी फंड वितरण, अल्पसंख्याक आणि नियोजित भेट वस्तू योजनेविषयी उपस्थितांना माहिती दिली. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री. भालचंद्र पाटील म्हणाले, संस्कार, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देत सभेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब आ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभा अनेक नवनविन उपक्रम राबवित आहे. अनेक शाखांच्या भव्य इमारती, शिष्यवृत्ती व जीवनसंजीवनी फंडामध्ये भरघोस वाढ आणि वितरणामध्ये बदल घडून आले आहेत. खेडोपाडी असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देवून अशा शिक्षण संस्था निर्माण करणे किंवा असलेल्या शिक्षण संस्थेत अशा मुलांच्या प्रवेशासाठी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात सर्वोतोपरी मदतीसाठी सभेने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

कोकण विभागामध्ये प्रथमच हे अधिवेशन संपन्न होत आहे, या विभागामधील विविध अडचणी व योजनांचा आढावा घेवून निश्चितच येथून पुढे भक्कमपणे पावले टाकून विविध उपक्रम राबविण्यात येतील असे मत  केेंद्रीय उपाध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील यांनी व्यक्त करून  अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या महामंत्री अजित शिराळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद दिले. महामंत्री अजित शिराळकर व भ. शांतिनाथ मंदिरचे अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांचेही मनोगत झाले.

कोकण विभागाच्या महिला महामंत्री सौ.पद्मश्री कासार यांनी आभार मानले. मुख्याध्यापक श्री. सविंद्र पाटील व श्री. प्रदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास कोकण विभागासह, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी या विभागातील सभेच्या शाखांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशन संपन्न करण्यासाठी कोकण विभागाचे महामंत्री अजित शिराळकर, उपाध्यक्ष वृषभ उपाध्ये, म. महामंत्री पद्मश्री कासार तसेच डॉ. अनिल पाटील यांच्यासह दिगंबर जैन मंडळ रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.