Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रांताधिकाऱ्यानेच केले खासगी जागेत अतिक्रमण, सांगलीतील दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न

प्रांताधिकाऱ्यानेच केले खासगी जागेत अतिक्रमण, सांगलीतील दाम्पत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न


सांगली शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी शेजारी असणाऱया जागेवर प्रांताधिकाऱयानेच अतिक्रमण केले. त्या विरोधात दाम्पत्याने पोलीस ठाण्यात तसेच महापालिकेत तक्रार दिली. यामध्ये दाम्पत्याला निराशा आल्याने पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली असून, पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

सांगली शहरातील दक्षिण शिवाजीनगर येथील जुन्या माळी चित्र मंदिराच्या मागील बाजूस सुनील पाटील यांनी 2006 मध्ये दोन गुंठे जागा खरेदी केली आहे. त्याची रितसर नोंददेखील केली. त्यांच्याकडे असणाऱया कागदपत्रांनुसार त्यांच्या आणि जुन्या मालकांमध्ये 2100 स्क्वेअर फूट जागेची खरेदी झाली. यानंतर पाटील यांच्या भूखंडावर सुमारे 300 स्क्वेअर फूट अतिक्रमण झाले आहे. त्यांच्या जागेवर शेजारी असणाऱया गजानन गुरव यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे.

गजानन गुरव हे पंढरपूर येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत. उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. याबाबत पाटील यांनी जागेशी संबंधित विविध विभागांसह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. याप्रकरणी सुनील पाटील यांनी जागेचे मूळ मालक माळी यांच्यासमवेत गुरव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

गुरव यांनी आपल्या जागेवर बांधकाम केले असून, त्याला महापालिकेकडून परवानगीदेखील मिळाली आहे. त्यामुळे पाटील कुटुंब पुन्हा आक्रमक झाले. न्याय मिळत नसल्याने सुनील पाटील यांनी कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे इच्छामरण अर्ज दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याने इच्छामरण द्यावे, अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे.

दरम्यान, महापालिकेकडे तक्रार दाखल करूनदेखील गुरव यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे पाटील यांच्या पत्नी सारिका पाटील यांनी थेट महापालिकेच्या कार्यालयात जाऊन महापौरांच्या दालनामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. जागेच्या अतिक्रमणाबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे सर्व प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने आपण याबाबत काही बोलू शकत नसल्याचे सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.