Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोरोना विषाणू पेक्षा घातक साथीसाठी जगाने तयार रहावे;डब्ल्यू एच ओ चे सरचिटणीस घेब्रेयेसूस

कोरोना विषाणू पेक्षा घातक साथीसाठी जगाने तयार रहावे;डब्ल्यू एच ओ चे सरचिटणीस घेब्रेयेसूस 


जिनिव्हा : जगाला पुढील काळात उद्‍भवणाऱ्या साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. ती साथ कोरोना विषाणूपेक्षा जास्त घातक असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांनी दिला.

आरोग्य संघटनेच्या ७६ व्या जागतिक वार्षिक परिषदेत ते नुकतेच बोलत होते. भविष्यातील साथीच्या रोगांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने वाटाघाटींना प्राधान्य देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. कोरोनाची महासाथ ही आता जागतिक आरोग्य आणीबाणी नाही, असे 'डब्ल्यूएचओ'ने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. 

त्यानंतर आज घेब्रेयेसूस यांनी सध्या सुरू असलेली ही साथ संपुष्टात आलेली नाही, असा सावध इशाराही दिला आहे. जगभरात दोन कोटी लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनापेक्षाही विनाशक असलेल्या विषाणूच्या साथीचा सामना करण्याची तयारी जगाने केली पाहिजे, असे ते म्हणाले.

शतकातील सर्वांत गंभीर आरोग्य संकट ठरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीने जगाला मोठा धक्का बसलाच शिवाय या साथीला तोंड देण्याची तयारी नसल्याचे आढळून आले, असे घेब्रेयेसूस म्हणाले. पुढील साथीचे रोग रोखण्यासाठी चर्चा पुढे नेण्याची वेळ आली आहे. 

अम्ही ते मार्ग टाळू शकत नाहीत. पुढील जागतिक साथ उंबरठ्यावर पोहचण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा इशारा त्यांनी दिला. हे रोखण्यासाठी जे बदल करणे आवश्यक आहे ते जर आपण केले नाही तर कोण करणार आणि जर आपण ते आता केले नाही तर केव्हा करणार, असा सवाल 'डब्लूएचओ'च्या प्रमुखांनी केला.

जागतिक आरोग्याच्या आव्हानांवर चर्चा

जागतिक आरोग्य संघटना यंदा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या दहा दिवसांच्या जागतिक आरोग्य परिषदेत आगामी काळातील साथरोग, पोलिओचे निर्मूलन, रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये निर्माण झालेली आरोग्याचे संकट कमी करण्यासाठी पावले उचलणे आदी जागतिक आव्हानांवर चर्चा होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.