Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुग्णाचा एक्सरे मशिनवर आणि फोटो मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील प्रकार

रुग्णाचा एक्सरे मशिनवर आणि फोटो मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील प्रकार


सांगली: शासकीय रुग्णालयांत रुग्णाचा एक्सरे काढल्यानंतर मोबाईलवर त्याचा फोटो काढून डॉक्टरांना दाखवावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मोबाईलवर दिसणाऱ्या अस्पष्ट चित्राच्या आधारेच रुग्णाच्या आजाराचे निदान केले जात आहे. शासकीय रुग्णालयांतील सेवांचे व्यवस्थापन करणारी एचएमआयएस (हॉस्पीटल मॅनेजमेंट ॲण्ड इन्फो सिस्टीम) प्रणाली जुलै २०२२ पासून बंद असल्याने ही स्थिती ओढवली आहे.

राज्यातील सर्वच १६ शासकीय रुग्णालयांत सन २०१६ पासून ही खासगी कंपनीची प्रणाली वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने वापरात आणली होती. जुलै २०२२ पासून कंपनीचा करार संपला, शिवाय काही वादही निर्माण झाल्याने कंपनीने शासनाविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे १० महिन्यांपासून सर्व रुग्णालयांतील वैद्यकीय सेवांचा तपशील हाताने लिहिला जात आहे. संबंधित कंपनीने प्रणाली वापरताना स्वत:चे कर्मचारी, संगणक आदी यंत्रणा उभी केली होती. रुग्णांच्या नोंदी, त्यांचा वैद्यकीय इतिहास, औषध योजना, प्रयोगशाळेतील तपासणीचे अहवाल, एक्सरे, सीटी स्कॅन व एमआरआय आदी तपासण्या, शस्त्रक्रियेचे तपशील आदी सर्व नोंदी ऑनलाईन केल्या होत्या. डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होत्या. प्रणाली बंद झाल्यापासून रुग्ण आणि डॉक्टरांचे हाल सुरु आहेत. यापूर्वी एचएमआयएस प्रणालीमध्ये नोंद झालेला लाखो रुग्णांचा तपशीलही सध्या उपलब्ध नाही.

मोबाईलच्या फोटोवरुन निदान


एक्सरे काढल्यावर रुग्णाच्या मोबाईलवर त्याचा फोटो काढला जातो. तो पाहून डॉक्टर निदान करत आहेत. फोटो अस्पष्ट असल्यास निदानही चुकीचे होण्याचा धोका आहे. सीटी स्कॅन व एमआरआयचीही अशीच स्थिती आहे. यापूर्वी एक्सरे ऑनलाईन स्वरुपात डॉक्टरांना मिळत होता. मिरज शासकीय रुग्णालयात दररोज सरासरी १५० एक्सरे काढले जातात. ते सर्व मोबाईलमधील छायाचित्रातून डॉक्टरांना द्यावे लागत आहेत. काहीवेळा बाह्यरुग्ण विभागात तपासणी संपेपर्यंत डॉक्टर रुग्णांना थांबवून ठेवतात. त्यानंतर दुपारी रुग्णासोबत एक्सरे विभागात येऊन प्रत्यक्ष एक्सरे पाहतात. एक्सरेसाठी ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्यापासून त्याची फिल्म खरेदी थार्वण्यात आली. त्यामुळे रुग्णालत त्या उपलब्ध नाहीत.

एचएमआयएस प्रणालीचा निर्णय राज्य स्तरावर होतो. सध्या सर्व कामकाज हाताने लिहिले जात आहे. यात रुग्ण आणि डॉक्टर या दोहोंची ससेहोलपट सुरु आहे. हाताने लिहिलेला हा तपशील भविष्यात वेळोवेळी मिळवण्यासाठी बराच खटाटोप करावा लागणार आहे.

- डॉ. रुपेश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय रुग्णालय, मिरज

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.