चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर गोळीबार
चंद्रपूर शहरात काल (गुरुवारी) झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारातून ते थोडक्यात बचावले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. संतोष रावत यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करताच हल्लेखोरांनी गाडीतून पळ काढला.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने ( MH 34 6152) आले होते. संतोष रावत हे सी.डी.सी.सी.बँकेसमोरून दुचाकीवरून जात असताना अचानक गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी रावत यांच्या दिशेनं गोळीबार केला.
यात एक गोळी त्यांच्या हाताला स्पर्श करून गेली, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. एका बुरखाधारक व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले आहेत. या हल्ल्याप्रकरणी संतोष रावत यांनी मुल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपास करीत आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असून हल्ला करत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.