Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भपाताची औषधे विकणार्‍या तिघांना अटक

गर्भपाताची औषधे विकणार्‍या तिघांना अटक 


छत्रपती संभाजीनगर : शहरासह ग्रामीण भागात अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस येऊन वर्षही होते न होते तोच अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या विक्री करताना तिघांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या गोळ्या साखळी पद्धतीने विक्री केल्याच जात होत्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून २७ मे रोजी रात्री उशिरा आरोपींविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू भगवान अहिरे (३२, रा. एन-१३, सिडको), नितीन सुखदेव बटोळे (रा.आर्च गुलमोहर, विवेकानंद महाविद्यालयाजवळ, शिवाजीनगर) अशी त्या दोघा विक्रेत्याची नावे असून अभिलाष विजय शर्मा (रा. समर्थनगर) असे त्या मेडीकल चालकाचे नाव आहे.  पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या ताब्यातून १७ हजार ८७ रुपयांच्या गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई अन्न व औषधे प्रशासन विभाग (एफडीआय) आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

पोलिसांनी सांगितले की, औषधी प्रशासन विभागाचे 'एफडीआय'चे निरीक्षक जीवन दत्तात्रेय जाधव (४४) आणि गुन्हे शाखा यांना महावीर चौकातील पेट्रोल पंप परिसरात एक जण अवैधरित्या गर्भपाताच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. 

त्यावरुन जाधव यांच्यासह गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता, राजू अहिरे हा गर्भपाताच्या गोळ्या विक्रीसाठी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार हजार २५० रुपये किमतीच्या १० स्ट्रीप सापडल्या. 

अशी उघड झाली साखळी

आरोपी अहिरे याला अटक करून त्याच्याकडील गोळ्या जप्त केल्यानंतर त्याने सदर गोळ्या वरद गणेश मंदिर परिसरातील द मेडीकलवाला या मेडीकलमधून यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.  त्यावरुन पोलिसांनी समर्थनगरात धाव घेतली. दरम्यान मेडीकल चालक व मालक अभिलाष विजय शर्मा याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सापडलेल्या दोन हजार ९७५ रुपयांच्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. 

शर्मा याने सदर गोळ्या आरोपी नितीन बटोळे याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान शर्माला बटोळेचा पत्ता विचारला असता त्याने आपल्याला पत्ता माहिती नाही, मात्र बटोळे हा गर्भपाताच्या गोळ्या नेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.  त्याच वेळी पोलिसांनी दुकानाच्या आजूबाजूला सापळा रचला असता, काही वेळातच बटोळे आला असता, त्याला पोलिसांनी पकडले आणि त्याची झडती घेतली असता, त्याच्या खिशात तब्बल ५ हजार १०० रुपयांच्या गोळ्या सापडल्या. पोलिसांनी सर्व साठा जप्त केला असून तिघांना अटक केली. आरोपींविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अशोक शिर्के करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.