समीर वानखेडे यांच्यासह एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त
मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआय आणखी ऍक्टिव्ह झाली आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन सीबीआयने जप्त केले आहेत. सीबीआयने कालच ही कारवाई केली आहे. या सर्व मोबाईल फोनचं तांत्रिक विश्लेषण केलं जाणार आहे. समीर वानखेडे यांच्यासह विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांचे वापरातील फोन सीबीआयने जप्त केले आहेत. 18 मे रोजी समीर वानखेडे यांची सीबीआय टीमकडून चौकशी केली जाणार आहे.
या चौकशीआधी मोबाईल जप्तीची ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांच्या गोरेगावच्या घरी धाड टाकली होती. तेव्हाच समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्या चौकशीनंतर विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांनाही सीबीआय चौकशीचं समन्स बजावणार आहे.
...काय आहे प्रकरण?
2 ऑक्टोबर 2021 ला क्रूज ऑन ड्रग्स प्रकरणी एनसीबीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. या प्रकरणात आर्यन खान याच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यासह एनसीबी अधिकारी आणि या प्रकरणातला स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर करण्यात येत आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये या सगळ्यांची नावं आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार गोसावीने 2021 साली एनसीबी मुंबई क्षेत्राचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या मार्फत पैसे वसुली करण्याचा प्लान केला होता.या प्रकरणातला नंबर एक साक्षीदार प्रभाकर सेल याने वानखेडे आणि गोसावी यांनी आर्यन खानच्या कुटुंबाकडून मोठी रक्कम वसूल करण्याची योजना आखली होती असा आरोप केला, यानंतर एनसीबीने एसआयटीची स्थापना केली. एसआयटीच्या चौकशीमध्ये टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता, यानंतर सीबीआयने कारवाईला सुरूवात केली. समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी त्यांच्या घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली. समीर वानखेडे यांनी केलेल्या परदेश वारीचे म्हणावे तसे स्पष्टीकरण व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत त्यांनी दिले नाही. महागडी घड्याळ आणि महागड्या गाड्या कुठून आल्या याचेही उत्तर देण्यात वानखेडे असमर्थ राहिले अस सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.