Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली बाजार समितीत आता सभापती पदासाठी चुरस, सुजय शिंदे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत

सांगली बाजार समितीत आता सभापती पदासाठी चुरस, सुजय शिंदे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत


बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले आहे. यामुळे आता सभापती पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीमधून हालचाली सुरू झाल्या आहेत. यात जतचे सुजय शिंदे, मिरजेतून संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. सुजय शिंदे यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सांगली बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे अशी एकत्रित महाविकास आघाडी झाली होती. या महाविकास आघाडीला बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा मिळाल्या आहेत तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सध्या सभापती आणि उपसभापती कोण असणार, याची चर्चा सुरू आहे. प्रत्येक गटाला सभापती, उपसभापतीपदाची संधी दिली जाणार आहे.

पहिला सभापती स्वच्छ प्रतिमेचा आणि बाजार समितीच्या कारभाराला गती देणारा असावा, असे सर्वच नेत्यांचे मत आहे. सुजय शिंदे हे जतचे असून, बी. आर. शिंदे हे त्यांचे आजोबा १९८६ ते ८९ या कालावधीत सभापती होते. सुजय यांचे वडील अशोक शिंदे हेही १९९३ ते ९६ पर्यंत सांगली बाजार समितीचे सभापती होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ अशी सुजय शिंदे यांची ओळख आहे. तसेच जतला संधी देण्याचा विचार झाल्यास सुजय शिंदे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडू शकते. बाबगोंडा पाटील हेही काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असल्यामुळे त्यांच्या नावाचा सभापती पदासाठी विचार होऊ शकतो. संग्राम पाटील हे दादा कुटुंबातीलच असल्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पण, संग्राम पाटील हे अभ्यासू असल्यामुळे कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्यास त्यांनाही सभापतीपदाची संधी मिळू शकते.

उपसभापतीपदाची संधी राष्ट्रवादी, घोरपडे गटाला - - सभापतीपद पहिल्या टप्प्यात काँग्रेसकडे राहिल्यास उपसभापतीपद हे राष्ट्रवादी अथवा माजी मंत्री घोरपडे गटाकडे जाऊ शकते. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यांतून अनेक इच्छुक आहेत. सभापतीपद जतला दिल्यास उपसभापतीपदाची संधी मिरज अथवा कवठेमहांकाळ तालुक्याला मिळू शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.