सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने महामंडळ मजबूत केले.आमदार डॉ. विश्वजीत कदम
सांगली दि. २२: सांगलीत मे २०२२ मध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनातील संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती अचंबित करणारी होती. अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्नावर चर्चा होऊन ठराव झाले. राज्यभर महामंडळ मजबूत करायचे काम सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने अधिवेशनाच्या माध्यमातून केले आहे. हे अधिवेशन भव्य दिव्य व ऐतिहासिक स्वरुपात संपन्न करण्यासाठी रावसाहेब पाटील यांनी सहा महिने परिश्रमपूर्वक तयारी केली होती.एवढे भव्य दिव्य अधिवेशन पहिल्यांदाच आम्ही सांगलीत समक्ष उपस्थित राहून पाहिले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी रावसाहेब व जिल्हा संघ प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभर संस्था चालकांत जागृती झाली आहे. संस्था संघटन मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाची भूमिका महत्त्वाची आहे. रावसाहेबांचा राज्यस्तरीय बहुमान करण्यासाठी माझे प्रयत्न निश्चितच राहतील. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.ते आज सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाला अडीच लाखाचा चेक रावसाहेब पाटील यांचेकडे सुपुर्द करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील होते. ते पुढे म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम हे कायम खासगी शिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते धडपडत. अधिवेशनात त्यांचे नाव व्यासपीठाला देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला त्याबद्दल मी रावसाहेब आणि जिल्हा संघाला धन्यवाद देतो.यावेळी रावसाहेब पाटील यांच्या हस्ते आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रावसाहेब पाटील यांनी 'स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी यापूर्वी मोठ्या प्रमाणात अधिवेशन व संघाच्या कामासाठी भरघोस मदत केली आहे. शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत अग्रेसर रहात. आता आमदार डॉ. विश्वजीत कदमही संस्थाचालक व लोकप्रतिनिधी म्हणून वडिलांप्रमाणे खूप मदत करतात.' यावेळी डॉ. कदम यांनी जिल्हा संघाला अडीच लाखाचा धनादेश रावसाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अरुण दांडेकर, प्रा. एन.डी.बिरनाळे, प्रा. आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे, प्रा. शिवपुत्र आरबोळे, संजय यादव व जिल्हा संघाचे कार्यकर्ते व संस्थाचालक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.