शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेने स्व. वसंतदादा पाटील यांचा ४७ वर्षापूर्वीचा राजकीय संन्यास: आठवणीं पुन्हा झाल्या ताज्या ..
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने निर्माण झालेल्या राजकीय स्थितीची तुलना ४७ वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी घेतलेल्या राजकीय संन्यासाच्या घोषणेसोबत केली जात आहे. मात्र, राजसंन्यास घेतलेले दादा आणीबाणीनंतर काँग्रेसचे घर जळत असताना गप्प कसा राहू असे म्हणत पुन्हा राजकीय कार्यामध्ये सक्रिय झाले होते याच घटनेची तुलना सध्या पवार यांच्या राजकीय खेळीशी केली जात आहे.
राज्यातील राजकारणात हेड मास्टर म्हणून ओळख असलेले शंकरराव चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून राज्याची आणि पक्षाची सूत्रे होती. पक्षांतर्गत मतभेदातून वसंतदादांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न सुरू होते. यातून चव्हाण यांनी दादांना मंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता. त्यांनी मंत्रीपदाचा त्याग करीत मी बेरजेचे राजकारण करणारा माणूस असून वजाबाकीचे राजकारण आपल्याला पटत नाही असे सांगत त्यांनी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा ३ नोव्हेंबर १९७५ रोजी केली होती. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. विलासराव शिंदे व बाजीराव गोंधळ ( राम आणि लक्ष्मण ) असे या जोडीचे नाव ठेवले गेले यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या समितीने दादांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले. त्याआधी पूर्ण जिलहा पिजंन काढून जिल्हा व महाराष्ट्र एक करून दादांना निवृत्त होण्यापासून रोखले होते. त्यावेळी विलासराव शिंदे ( राम) आणि बाजीराव गोंधळे ( लक्ष्मण) ओळखले जाऊ लागले निवडणुकीत काँग्रेसचा देशपातळीवर पराभव झाल्याने दादांनी राजकीय संन्यासाची वस्त्रे बाजूला ठेवून काँग्रेसचे घर जळत असताना गप्प कसा बसू असे म्हणत पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. या घटनेची तुलना आता पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याशी केली जात आहे.खा. पवार यांनी अनपेक्षितपणे अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर अवाक झालेच, पण प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे व्यासपीठावरच रडू लागल्याचे अनेकांनी पाहिले. यामुळे याच्या प्रतिक्रिया सांगली जिल्ह्यात उमटणे स्वाभाविकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात जयंत पाटील यांच्यासह चार आमदार आहेत. तासगाव कवठेमहांकाळच्या सुमनताई पाटील, शिराळ्याचे मानसिंगराव नाईक आणि पदवीधर गटातील विधानपरिषदेचे अरूण लाड हे ते चार आमदार आहेत. महापालिकेत महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे.पक्षात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे पक्षाचे पदाधिकारीही अस्वथ असून प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्याकडे सोपवला आहे. मुंबईतील घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष असून निर्माण झालेली अस्वस्थता आणखी काही दिवस राहणार आहे. सध्या पदाधिकार्यांचे वेट अॅण्ड वॉच असेच धोरण राहिले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सध्या तरी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मजबूत असून आगामी निवडणुकीची तयारीही पक्षाने सुरू केली आहे. तत्पुर्वी नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीमध्ये योग्य त्या ठिकाणी लवचिकता दाखवत सत्तेचा सोपान अधिक सुलभ कसा होईल याचीही दक्षता घेत पक्षबांधणी सुरू ठेवली आहे. सांगलीत महाविकास आघाडीसोबत, तर तासगावमध्ये स्वबळावर आणि आटपाडीमध्ये भाजपसोबत बाजार समितीमध्ये आपले अस्तित्व पक्षाने दाखवले आहे. आता जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे कार्यकर्ते तयारी करीत असताना अचानक खा. पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय आल्याने अस्वस्थता निर्माण झालेली असली तरी प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्या भूमिकेकडेही नजर राहणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.