Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाने वाटलेल्या साड्या, कोंबड्या मतदारांनी नाकारल्या

भाजपाने वाटलेल्या साड्या, कोंबड्या मतदारांनी नाकारल्या


बेळगाव, ता. १२: कर्नाटक विधानसभेसाठी बुधवार दि. १० मे रोजी मतदान पार पडले. त्याआधी मंगळवारी रात्री कर्नाटकात मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. मात्र के आर पेट विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी रेवड्या वाटणाऱ्या नेत्यांना चांगलाच धडा शिकवला. या मतदारसंघात मंगळवारी रात्री भाजपाच्या काही नेत्यांनी ग्रामस्थांच्या घराबाहेर कोंबड्या आणि साड्या ठेवल्या होत्या. बुधवारी सकाळी मतदारांनी या भेटवस्तू गावातील भाजपा नेत्यांच्या घरासमोर जाऊन पुन्हा टाकल्या. ही बाब बाहेर आल्यानंतर काँग्रेसने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. के आर पेंट विधानसभेत येणाऱ्या बोकनकेरे तालुक्यात गंजिगेरे हे गाव येते. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे मोठे नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा जन्म याच गावात झाला होता. या गावातील ग्रामस्थांनी भाजपाने वाटलेल्या भेटवस्तू घेण्यास नकार दिला. या घटनेचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

बुधवारी सकाळी ग्रामस्थ भाजपा नेत्याच्या घराबाहेर भेटवस्तू फेकतानाचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले. या भेटवस्तू नाकारत असताना ग्रामस्थांनी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. निषेध व्यक्त करीत असताना मतदारांनी कन्नडमध्ये धिक्कारा असे नारे दिले. निवडणूक आयोगाकडे मात्र अशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. तक्रार मिळाली नसली तरी आम्ही या प्रकरणात लक्ष घालू, असे आयोगाने सांगितले आहे. या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपा पक्षाचे पदाधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.