Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्राफिक सिग्नलची वेळ सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंतच

ट्राफिक सिग्नलची वेळ सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंतच 

सोलापूर : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस खूपच वाढू लागला आहे. मागील काही दिवसांत सोलापूरचे तापमान ४१ अंशावरच आहे. या पार्श्वभूमीवर आता शहरातील सिग्नल यंत्रणा सकाळी पूर्णत: बंद ठेवली जाणार आहे. उन्हामुळे सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेतच आता सिग्नल सुरू राहणार आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. अजित बोऱ्हाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

सोलापूर शहरात दक्षिण व उत्तर असे वाहतूक शाखेचे दोन विभाग आहेत. वाहतूक शाखेकडे संपूर्ण शहराचे वाहतूक नियमन करण्यासाठी केवळ १३५ अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यातील काहीजण ५५ वर्षांवरील असून काहींना पूर्वीचे आजार आहेत. अशा लोकांना उन्हाची तीव्रता पाहता उन्हातील ड्यूटी न देण्यासंदर्भातील सक्त सूचना पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दुसरीकडे जे वाहतूक अंमलदार रस्त्यांवर किंवा चौकात ड्यूटी करीत आहेत, त्यांच्यासाठी पाणी व बैठक व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाणार आहे. दिवसभर आठ तास उन्हात उभारून वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक अमंलदारांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा निर्णय घेतला आहे. उन्हाच्या तडाख्यात गरज नसताना सिग्नल सुरु ठेवू नका, अशा सूचना शहर पोलिस उपायुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरातील १९ पैकी सध्या १२ सिग्नल सुरु आहेत.

बंदोबस्ताचा ताण अन्‌ तपासाचे काम

वर्षभरात सर्वाधिक सण-उत्सव व महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर सोलापूर शहर-जिल्ह्यात साजऱ्या केल्या जातात. त्यामुळे वर्षातील २०० पेक्षा अधिक दिवस बंदोबस्ताचीच ड्यूटी करावी लागते. आगामी दीड वर्षांचा काळ निवडणुकीचा असल्याने पोलिस अधिकारी व अंमलदारांना आता बाहेरील बंदोबस्त असणार आहे.

बंदोबस्ताचा ताण आणि नियमित तपासाचे काम, यामुळे अनेकांच्या तब्बेतीवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मनुष्यबळ अगोदरच कमी आहे. आता नवीन पोलिस भरतीतून दहा महिन्यांनी रिक्त पदे भरली जातील. तत्पूर्वी, कर्मचाऱ्यांनी नियमित व्यायाम करणे अपेक्षित आहे. पोलिस तंदुरुस्त राहावेत म्हणून पोलिस विभागातर्फे नियमित आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. तसेच परेड व शारीरिक व्यायाम देखील घेतले जात आहेत.

अनफिट पोलिस अंमलदारांच्या खबरदारीच्या सूचना

वाहतूक शाखेतील ५५ वर्षांवरील अनफिट पोलिस अंमलदारांना रस्त्यांवर उभारून वाहतूक नियमन करण्याची ड्यूटी दिली जाणार नाही. त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने तसे निर्देश दिले आहेत.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

५५ वर्षांवरील अंमलदारांना उन्हात ड्यूटी न देण्याचे निर्देश

उन्हाच्या तडाख्यात वाहतूक पोलिस अंमलदारांना रस्त्यांवरील ड्यूटी न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील काही दिवसांपासून सोलापूरचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्तच आहे. त्यादृष्टीने पोलिस अंमलदारांची काळजी घेतली जात आहे.

- शिरीष सरदेपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.