दुचाकी, मोटारीच्या डिकी फोडणारा आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद ; सांगली एलसीबीची कारवाई
सांगली, ता. 5 : दुचाकी, मोपेड आणि मोटारीच्या डिकीतून रोकड लांबवणाऱ्या मधु भास्कर जाला (वय 25 रा. कपरालतिप्पा, जिल्हा नेल्लोर, राज्य आंध्रप्रदेश) या आंतरराज्य गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून सहा लाख रोख व दुचाकी जप्त केली. त्याने विश्रामबाग, आष्टा, कवठेमहांकाळ, इचलकरंजी, कोल्हापूर येथे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक माहिती अशी, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत 24 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास एचडीएफसी बँकेजवळ आलेल्या गोपालदास हिरालाल मुंदडा यांनी त्यांच्याकडील रोख 2 लाख 95 हजार रुपये मोपेडच्या डिकीमध्ये ठेवले होते. संशयित मधूने डिकीतुन रोकड लांबवली. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार एक पथक शोध घेत होते. पथकाने जिल्हयात व परजिल्हयात घडलेल्या गुन्हयाची माहिती घेतली. पोलिस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर यांना सदरचे गुन्हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असुन ते कुपवाड, हनुमाननगर मधील गजानन पाटील यांचे भाडयाचे खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली. पथकाने छापा मारुन मधु भास्कर जाला याला ताब्यात घेतले. चौकशीत तो त्याचा साथीदार यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पाळत ठेवून गाडीच्या डिकीतुन किंवा मोटारीची काच फोडून रोकड लांबवत असल्याचे सांगातले. घराची झडती घेतल्यावर सॅकमध्ये सहा लाख रोख मिळाले. ही रक्कम त्याच्या वाटणीस आल्याचे सांगितले. आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वी गुजरात राज्य, राजकोट या ठिकाणी चार गुन्हे दाखल आहेत.पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सागर लवटे, अनिल कोळेकर, संदीप गुरव, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, सागर टिंगरे, उदयसिंह माळी, विक्रम खोत, संतोष गळवे, संदीप नलवडे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.