पाण्यावर तासनतास तरंगतोय सागंलीचा अवलिया; वाहत्या आणि स्थिर पाण्यात तरंगण्याचे कसब
पुनवत (जि. सांगली) : कला कधी माणसाच्या जगण्याचे साधन बनते, तर कधी त्याला प्रकाशझोतात आणत असते. मोरेवाडी (ता.शिराळा) येथील संदीप डिगे यांनी पाण्यावर तरंगण्याची आगळीवेगळी कला प्राप्त केली आहे. लोक पोहताना हातपाय हलवतात; पण संदीप डिगे हातपाय न हलवता तासनतास पाण्यावर तरंगतात. त्यामुळे ते परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.
चिंचोलीजवळच्या मोरेवाडी येथील ३९ वर्षांचे संदीप मारुती डिगे मुंबईतील कंपनीत यंत्रचालक म्हणून काम करतात. पोहणे हा त्यांचा आवडता छंद आहे. वयाच्या सहाव्या वर्षी ते पोहायला शिकले. वेगवेगळ्या पद्धतीने कसे पोहता येईल, यासाठी त्यांनी मुद्दाम प्रयत्न केले. त्यातूनच त्यांना हातपाय न हलवता पाण्यावर जास्तीत जास्त काळ तरंगण्याची कला अवगत झाली.
गावी आल्यावर ते नदी, विहीर, वारणा कालव्यात पोहायला जातात. पाण्यात उतरले की पाण्यावर वरच्या दिशेला तोंड करून हात बाजूला घेऊन कोणतीही हालचाल न करता ते तासनतास तरंगतात. वाहत्या व स्थिर पाण्यात तरंगण्याचे कसब ते दाखवतात. बघणाऱ्यांना त्यांच्या या कलेचे कौतुक वाटते. पोहताना जास्तीत जास्त पाठीवर पोहोण्याचा सराव केल्याने पाण्यावर तरंगण्याची कला अवगत झाली. न थकता कितीही काळ पाण्यावर तरंगू शकतो. नियमित सराव हेच यामागचे कारण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.