सरन्यायाधीश चंद्रचूड वकिलांवर पुन्हा भडकले
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड अनेकविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य करताना दिसत आहेत. केंद्रीय कायदा मंत्री यांनीही सरन्यायाधीश डी.चंद्रचूड यांनी दिलेल्या निर्देशांबाबत कौतुक केले आहे. अलीकडेच दोन याचिकांवरील सुनावणी दरम्यान सीजेआय चंद्रचूड यांनी वकिलांवर संताप व्यक्त केला होता. यातच पुन्हा एकदा चंद्रचूड यांनी एका वकिलाला चांगलेच फटकारले आहे. चंद्रचूड याचिकांवर सुनावणी घेत होते. तेव्हाच एका वकिलाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात खटल्यांची यादी योग्य पद्धतीने केली जात नाही. वकिलांनी केलेली रिट याचिका पाहून सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, ही कसली रिट आहे. आता १४० याचिकांवर सुनावणी घेतोय, असे सांगत वकिलाला खडे बोल सुनावले आणि रिट याचिका फेटाळून लावली.
सर्वोच्च न्यायालयातील याचिकांच्या यादीवरून वकिलाची नाराजी
सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका दाखल केल्या जात आहेत, त्यांची यादी चुकीच्या पद्धतीने केली जाते. संवेदनशील प्रकरणांकडे लक्ष दिले जात नाही. कमी महत्त्वाच्या याचिकांवर प्रथम सुनावणी होत आहे, असा आक्षेप घेत न्यायालयातील प्रकरणांची यादी सॉफ्टवेअरद्वारे करावी, असा सल्लाही या वकिलाने दिला. या वकिलाने त्याची रिट याचिका थेट सरन्यायाधीशांच्या न्यायालयात दाखल केली. सदर वकील स्वतःही न्यायालयात उपस्थित होते. चंद्रचूड यांच्यासमोर ही याचिका सुनावणीसाठी आल्यावर ती पाहून ते चांगलेच संतापले.
चंद्रचूड यांनी वकिलाला प्रश्न करत चांगलेच सुनावले
सरन्यायाधीशांचा वकिलाला प्रश्न केला की, तुम्हाला काही माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयात सॉफ्टवेअरचाच वापर केला जातो. यातूनच याचिकांची यादी तयार केली जाते. तुम्ही बघा १४० केसेस चालू आहेत. सर्वोच्च न्यायालय कसे काम करते हे तुम्हाला माहिती आहे का, या शब्दांत चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले. तरीही या वकिलाने संवेदनशील प्रकरणांना प्राधान्यक्रम देण्याची विनंती केली. यावर सरन्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार, मास्टर ऑफ रोस्टर हे स्वतः CJI असतात. रजिस्ट्रार जनरल त्यांच्या निर्देशानुसारच याचिकांची यादी करतात. चंद्रचूड CJI झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची सुनावणी पूर्वीपेक्षा वेगवान झाल्याचे सांगितले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.