अध्यक्ष पदावरून शालिनीताई पाटील यांचे मोठं विधान
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा 2 मे रोजी केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील नेत्यांसह आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांकडूनही पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे, शरद पवार यांच्यानंतर आता अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याची चर्चा रंगली आहे. यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे नाव पुढे येत आहे.
मात्र माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांना अध्यक्षपद देणे चुकीचे असल्याचे मत मांडले आहे. “अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेलं. अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे. म्हणून ईडीकडून अद्याप त्यांची चौकशी झाली नाही. हसन मुश्रीफ यांची चौकशी केली जाते मग चौदाशे कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही?” असा सवालही शालिनीताई पाटील यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाला पसंती दर्शवली. तसेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनाच बनवाव असं मतही शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केले. तर शरद पवार यांनी घाईत निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली. शरद पवार माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला असल्याचे मत शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केले.
काय म्हणाले होते शरद पवार ?
'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात "कुठे थांबायच हे मला कळते. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, गेली सहा दशके राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सार्वजनिक निवृत्ती नाही. गेली सहा दशके मी जनसामान्यांसाठी जे काम करत गेलो आहे, त्या सेवेत आताही खंड पडू देणार नाही. विकास, शेती अशा काही क्षेत्रासाठी मी आता अधिक वेळ देईल,” असे शरद पवार यांनी म्हटले होते.
पवार पुढे म्हणाले, “आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने एक समिती नेमावी. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवर, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, फौजिया खान, नरहरी झिरवळ आदी असतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, याचा निर्णय या समितीने घ्यावा. सर्व कार्यकर्ते, नेत्यांना अधिकाधिक वेळ देणार, सर्वांना सोबत घेऊ जाणारा, असा अध्यक्ष निवडावा. राष्ट्रवादीचा अध्यक्ष निवडताना, या सर्वांचा विचार करावा.”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.