साताऱ्यातील एका उद्योजकाला मॅनेजरने तब्बल 4 कोटी 47 लाख 47 हजाराला गंडा घातला
साताऱ्यातील उद्योग क्षेत्राला हादरून सोडणारी बातमी समोर आली असून, एका उद्योजकाला त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजरने तब्बल ४ कोटी ४७ लाख, ४७ हजारांना गंडा घातला. कित्येक वर्षे मालकाच्या डोळ्यात धूळफेक करत बोगस कंपन्या स्थापन केल्या. एवढेच नव्हे तर अस्तित्वात नसलेले व्यवहार कागदावर दाखवून कंपनीत कोट्यवधीचा घोटाळा केला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित मॅनेजर आणि त्याच्या पत्नीला तातडीने बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
ललित मधुकर देशमाने, केतकी ललित देशमाने (रा. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील नवीन एमआयडीसीमध्ये 'सिद्धार्थ इंडस्ट्रीज' या नावाची कंपनी आहे. ही कंपनी विविध कंपन्यांकडून कच्चा माल घेऊन उत्पादन करते. तसेच तयार केलेल्या मालाची विक्री करते.
ललित देशमाने हा मॅनजर म्हणून या कंपनीत बऱ्याच वर्षांपासून काम करत होता. त्यामुळे कंपनीच्या मालकांचा त्याच्यावर विश्वास होता. कंपनीमधील उत्पादन, कच्च्या मालाचे रेकाॅर्ड ठेवणे, कंपनीचे अकाउंट बघणे तसेच कंपनीच्या कामगारांचा पुरवठा करणे आदी कामे ललिल देशमाने हा करत होता. दरम्यान, देशमाने याने नोकरी सोडल्यानंतर त्याच्या ठिकाणी दुर्गेश जंगम (वय ५१, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी मॅनेजर म्हणून चार्ज घेतला. त्यानंतर त्यांनी कंपनीचे रेकाॅर्ड तपासण्यात सुरुवात केली. त्यावेळी ललित देशमाने याने मॅनेजर म्हणून काम पाहत असताना कच्चा माल गरजेपेक्षा जास्त खरेदी केला असल्याचे निदर्शनास आले. तसेच अतिरिक्त कामगार कागदावर दाखविले. कंपनीच्या हिशोबामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचे लक्षात येताच हा प्रकार मॅनेजर दुर्गेश जंगम यांनी मालकांना सांगितला. त्यानंतर मालकांनी या गैरकारभाराची सीए मार्फत चाैकशी केली. त्यानंतर त्यांच्या सीए यांनी कंपनीचे रेकाॅर्ड तपासून त्याबाबतचा अहवाल मालकांना दिला.
अहवालात काय आढळून आलं..
ललित देशमाने याने उत्पादन करण्यासाठी जेवढ्या कच्च्या मालाची गरज आहे. त्यापेक्षा दुप्पट कच्चा माल कंपनीच्या नावे विकत घेतला. ज्या विक्रीदार कंपन्यांकडून कच्चा माल विकत घेतला जात होता. त्या कंपन्या देशमाने याने बोगस तयार केल्या. त्याचा मालक, भागीदार पत्नी व नातेवाईक दाखविले. कंपनीच्या अकाउंटमध्ये ज्या आलेल्या मालाचा हिशोब दाखविला आहे. तो कच्चा माल स्टोअर्समध्ये कधी आलाच नाही. कच्च्या मालाची बिले तपासली असता ज्या ट्रान्सपोर्ट वाहनाद्वारे कच्चा माल कंपनीत आला त्या गाड्या अस्तित्वातच नाहीत. या गाड्यांचे नंबर चक्क देशमाने याच्या दुचाकीचे असल्याचे समोर आले.
पोलिसांकडून तातडीने दखल
पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी तातडीने दखल घेऊन कारवाईसाठी पथक तयार केले. या पथकामध्ये पोलिस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, संतोष कचरे, क्रांती निकम, अभय साबळे यांचा समावेश केला. या पथकाने तातडीने ललित देशमाने आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या घरातून अटक केली. त्यांनी कंपनीत कशाप्रकारे घोटाळा केला, याची पोलिस कसून चाैकशी करत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.