स्मशानभूमीत माती सावरण्यासाठी गेलेल्यावर मधमाश्यांच्या हल्ल्यात; 25 जण जखमी
वाई : लोहारे (ता. वाई) येथील स्मशानभूमीत सावडण्याच्या विधीसाठी गेलेल्यांवर मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने २५ जण जखमी झाले. त्यापैकी चार जण गंभीर आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
याबाबत सुमीत सचिन शिंदे (वय १८, रा. लोहारे, ता. वाई) याने माहिती दिली की, लोहारे स्मशानभूमीत सावडण्याच्या विधीसाठी घरातील कुटुंबीय, पै-पाहुणे व ग्रामस्थ असे ७०-८० लोक जमले होते. सावडण्याचा विधी उरकल्यानंतर सर्वजण निघाले. त्यावेळी लगतच्या चिंचेच्या झाडावर असलेल्या आग्यामोहाच्या पोळ्यावरील मधमाश्या अचानक उठल्या आणि त्यांनी अनेकांवर हल्ला चढविला.
यामध्ये सुमीत शिंदेसह सुरेश खशाबा यादव (वय ६१), विजय कृष्णा यादव (वय ५५ दोघे रा. गुळुंब, ता. वाई) व राजेश मोहन धुमाळ (वय ४५, रा. सोनके) वगैरे २५ जण मधमाश्या चावल्याने जखमी झाले. कोणाच्या कपाळ, डोक्यावर, हातावर माश्यांनी चावा घेतला. त्यांच्यावर वाईच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. या घटनेची नोंद वाई पोलिसात झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.