सांगली महापालिका आयुक्तांवर हल्ला : शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकावर गुन्हा
सांगली : महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या दिशेने बूट फेकत हल्ला करण्याचा आणि शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना घडल्यानंतर महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. मात्र आयुक्त सुनील पवार यांनी आवाहन केल्यानंतर ते मागे घेण्यात आले.
सोमवारी दुपारी महापालिका आयुक्त दालनात आयुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाची सुनावणी सुरू होती. या सुनावणीस उपआयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी तक्रारदार कैलास काळे यानी आपल्या गुंठेवारी नियमितीकरणाच्या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या सुनावणी अमान्य करीत रागाने आयुक्तांच्या दिशेने बूट फेकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. याप्रकरणी संशयित कैलास काळे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी अशोक पवार यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख आयुक्त दालनात दाखल होत कैलास काळे यास ताब्यात घेतले. दरम्यान, प्रशासन प्रमुख असणाऱ्या आयुक्त सुनील पवार यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार समजताच महापालिकेचे कर्मचारी महापालिकेसमोर जमा झाले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केला.
घटनेनंतर आयुक्त सुनील पवार यांनी सर्वच कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोणीही कामबंद करू नये आणि आपाआपल्या कार्यालयात जावे असे आवाहन केले. दरम्यान महापालिकेच्या तक्रारीवरून आयुक्तांवर हल्ला करणाऱ्या कैलास काळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.