जत तालुक्यातील पाणीप्रश्न दोन वर्षात सोडविणार; जयंत पाटील
जत : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सहकाराच्या नियमात आणि घटनेत बदल करत आहे. बाजार समित्यांचे खासगीकरण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. अशा काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे.
यासाठी सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी पॅनलकडे एकहाती सत्ता द्या, असे आवाहन करत जतच्या वंचित गावांचा पाणीप्रश्न येत्या दाेन वर्षात सोडवू, अशी ग्वाही माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साेमवारी दिली. दरिकोणूर (ता. जत) येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत, जयश्रीताई पाटील, अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.जयंत पाटील म्हणाले, सांगली बाजार समितीच्या उमेदवारीबाबत काही लाेक नाराज झाले असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि भाजपाच्या विचाराला बाजूला सारण्यासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे. जत तालुक्यासाठी आम्ही सर्वात जास्त जागा दिल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी येथे एकदिलाने काम करत आहे. येणाऱ्या काळात जतच्या ६५ गावांना पाणी मिळणार आहे. मी मंत्री असताना सहा टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. पण, दुर्दैवाने सरकार गेल्याने ही योजना पूर्ण झाली नाही.आता सत्ताधारी सरकारने योजनेला मंजुरी दिली आहे, पण कामाला सुरुवात नाही. तरीही येत्या अडीच वर्षात जतच्या शिवारात पाणी आणण्याची जबाबदारी मी व विश्वजित कदम यांनी घेतली आहे. पाणी आल्यानंतर सर्वात जास्त फायदा जतला होणार आहे. यासाठी बाजार समितीही आपल्या ताब्यात असायला हवी.
सभेस सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, रमेश पाटील, सुरेश पाटील, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, सुजयनाना शिंदे, स्वप्नील शिंदे, बसवराज बिराजदार, पिराप्पा माळी, गणी मुल्ला, अमिन शेख, मच्छिंद्र वाघमोडे यांच्यासह संख, जाडर बोबलाद, दरिबडची, मुचंडी या चार जिल्हा परिषद गटातील सोसायटी व ग्रामपंचायत गटाचे मतदार, उमेदवार उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.