Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचा पुढचा अ‍ॅक्शन प्लॅन काय? नाना पटोलेंसह पक्षाचे दिग्गज सूरतमध्ये!

काँग्रेसचा पुढचा अ‍ॅक्शन प्लॅन काय? नाना पटोलेंसह पक्षाचे दिग्गज सूरतमध्ये!


नवी दिल्ली : मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आज राहुल गांधी सूरत सत्र न्यायालयात दाखल होत आहेत. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सूरत कोर्टात आज आव्हान दिलं जाईल. तसेच राहुल गांधी यांच्या जामानाची याचिकादेखील सादर केली जाईल. सूरत कोर्टाकडून राहुल गांधी यांना आज जेल मिळतेय की बेल याकडे काँग्रेस नेत्यांचं लक्ष लागंलय. तर कोर्टाच्या निकालानंतर पुढे काय करायचंय, याची तगडी रणनीतीदेखील काँग्रेस नेत्यांनी आखलेली दिसतेय. त्यामुळेच देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते आज सूरतमध्ये तळ ठोकून बसलेत.

आज काय काय घडणार?

आज सकाळी ११ वाजता सीजेएम कोर्टाच्या आदेशाविरोधात सूरत सत्र न्यायालयात आव्हान दिलं जाईल. तसेच जामीनाचा अर्जही दिला जाईल. नियमानुसार, लंचनंतर म्हणजेच दुपारी २ वाजता राहुल गांधी यांच्या याचिकेवर जिल्हा न्यायाधीश किंवा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यासंबंधी कोर्टात सुनावणी करतील. राहुल गांधी यांनी रेग्युलर बेलचीही विनंती केली आहे. त्यामुळे त्यांना आज कोर्टात उपस्थित राहणे आवश्यक आहे. ३ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वर्षांच्या शिक्षेबाबत बहुतांश वेळा सत्र न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवते. मात्र कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय सत्र न्यायालयाने बदलल्यास राहुल गांधी यांना तुरुंगातही जावे लागू शकते. या शिक्षेविरोधातही राहुल गांधी यांनी अपिल केल्यास, कोर्टाकडून गुजरात सरकार आणि तक्रारदाराला नोटीस दिली जाईल. अशा वेळी राहुल गांधी यांच्या शिक्षेबाबत आजच सुनावणी होण्याची शक्यता कमी वर्तवण्यात येतेय.

काँग्रेस नेते एकवटले

राहुल गांधी यांच्या शिक्षेवरून काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. एकिकडे लीगल टीमला घेऊन राहुल गांधी जामीनासाठी अर्ज करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनीही एकजुटीचा संदेश देण्यासाठी तगडी रणनीती आखली आहे. काँग्रेसचे तीन मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज आज सूरतममध्ये येत आहेत. यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासह काँग्रेसने अनेक कार्यकर्ते आज सूरत येथे जमा होतील. गुजरात काँग्रेसच्या सर्व नेत्यांना सूरतमध्ये जमा होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील सूरतमध्ये रवाना झाले आहेत. सूरत कोर्ट परिसरात राहुल गांधी यांच्यासोबत हे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील.

सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का असतं.. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. सूरत कोर्टाने २३ मार्च रोजी राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २४ मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. आज ११ दिवसानंतर राहुल गांधी सूरतच्या सत्र न्यायालयात या निर्णयानिरोधात याचिका दाखल करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.