Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान


मुंबई :  जे लोक स्वातंत्र्यवीरांना माफीविर म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काँग्रेसमध्ये  इंदिरा गांधी ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांनीच सावरकरांचा गौरव केला, अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यात 'सावरकर गौरव यात्रा' काढण्यात येत आहे. सोमवारी कांदिवली येथील यात्रेत देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सहभागी झाले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

फडणवीसांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

* राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर नाही आणि तुम्ही गांधीही नाही. सावरकर होण्याची तुमची औकात नाही. संसदेत बंगालच्या खासदाराने जेव्हा वीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडला, तेव्हा त्याचे समर्थन करणारे तुमचे आजोबा फिरोज गांधी होते. राहुल गांधी तुमच्या आजोबांनी काय केलं हे देखील तुम्हाला माहिती नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.

* एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमात्र आहेत. त्या शिक्षा झाल्या, तेव्हा इतके वर्ष तुमचे सरकार तरी चालणार आहे का, असे इंग्रजांना विचारण्याचीही हिंमत वीर सावरकरांनी दाखविली होती.

* इंग्लंडच्या राणीची मर्जी होईल, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल, अशी धारणा नव्हती. स्वातंत्र्य आम्हाला भीकेत नको होते. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली. वीर सावरकर यांनी 1857 च्या स्वातंत्र्यसमरावर पुस्तक लिहिले. त्याने लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली.

* सगळे स्वातंत्र्यसेनानी महान आहेत. पण, वीर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या, त्या कुणाच्या वाट्याला आल्या नाहीत. वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन व्यक्तींना कायमच काँग्रेसने विरोध केला.

* अंधश्रद्धेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात वीर सावरकरांनी लढा दिला. हिंदूत्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे वीर सावरकर होते. मराठी भाषेला शेकडो शब्द देणारे वीर सावरकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिणारे सुद्धा वीर सावरकरच होते.

* वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक आहेत, हे मात्र दुर्दैवी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसे मणिशंकर अय्यरच्या फोटोला जोडे मारले, तसेच तुम्हीही राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत दाखविली असती, तर मानले असते. तुमचे हिंदुत्व बेगडी आहे.

* तुम्हाला ज्याच्यासोबत जायचे असेल त्याच्यासोबत जा. पण, आम्ही हिंदुत्व सोडणार नाही. तुम्ही जेव्हा-जेव्हा वीर सावरकरांचा अपमान कराल, तेव्हा तेव्हा अशीच जनता रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असा इशारा फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.