काँग्रेसचे चाणक्य अडकले! प्रचारावेळी ५०० च्या नोटा टाकल्या
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. अंतर्गत सर्व्हेमुळे काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या वेळी भाजपाने काँग्रेस आणि निजदची सत्ता उलथवली होती. परंतू, कर्नाटक हे राज्य सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाण्याचा इतिहास असल्याने काँग्रेसने पुन्हा जोर लावण्यास सुरुवात केली आहे. अशातच काँग्रेसचे चाणक्य ओळखले जाणारे डी के शिवकुमार अडचणीत आले आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे एका रॅलीवेळी खाली असलेल्या लोकांवर ५०० च्या नोटा टाकत होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे मांड्याच्या स्थानिक न्यायालयाच्या आदेशावरून मांड्या ग्रामीण पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी डी के शिवकुमार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मांड्यामध्ये प्रजा ध्वनी यात्रेवेळी लोकांवर ते पैसे टाकत असल्याचे दिसत होते. यानंतर त्यांनी यावर खुलासा केला होता. बेविनाहळ्ळीमध्ये बसवरून मी कलाकारांना पैसे देत होतो, असे ते म्हणाले होते.
डीके शिवकुमार याआधीही वादग्रस्त ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक म्हटले होते. सूद हे राज्यातील भाजप सरकारचा बचाव करत असून काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपल्या पक्षाची सत्ता आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवकुमार यांनी दिला होता. टिपू सुलतानला मारणाऱ्या नांजे गौडा आणि उरी गौडा यांच्या नावाने प्रवेशद्वार बनविण्यास परवानगी दिल्यामुळे हे आरोप झाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.