एकनाथ शिंदे च्या नेतृत्वात आगामी निवडणुका भाजपाला लढ्यावयाला लागणार
देशात अग्रणी व राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष भाजप असला तरी राज्यात आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढविण्यात येतील, असे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २०२९पर्यंत भाजप सोबत राहिला तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असाही दावा केला.
अमरावती विभागाचा खरीप हंगाम आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री आज (ता. २८) अमरावतीत आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माझे जुने मित्र असून त्यांचे नाव मी मुख्यमंत्री पदासाठी घेतले नाही, प्रसार माध्यमांनीच ते चित्र तयार केले, असे स्पष्टीकरणही दिल्लीतील मुख्यमंत्री बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. भाजपचा सपोर्ट राहिला तर २०२९ पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. आगामी निवडणुकांमध्ये भाजपला एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. कोकणातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्र्यांनीच जागा प्रस्तावित केली आहे. आमचे सरकार त्याची अंमलबजावणी करीत आहे.
सत्ता गेल्याने ते आता विरोध करू लागले आहेत. त्यांचा केवळ विरोधासाठी विरोध सुरू आहे. विकास प्रकल्पाच्या मुद्यावर राजकारण करू नये. अशा प्रकारामुळे राज्यातील प्रकल्प व उद्योजक राज्याबाहेर जात आहेत. त्यांनी सुरू केलेल्या राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला असून अशावेळी कुणालाही सोडणार नाही, असा इशाराच सत्तारांनी यावेळी दिला. यंदाच्या खरीप हंगामात बियाणे व खतांची टंचाई जाणार नाही. विमा परताव्यासाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थींना परतावे देण्यासाठी फेरतपासणी करण्यात येईल. कृषी खात्यातील अमरावती विभागातील रिक्त पदे शंभर दिवसांत भरण्यात येतील. त्यामध्ये आदिवासी भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
चणा खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार..
राज्यात पणन खात्याने केंद्राला दिलेल्या माहितीच्या आधारे खरेदीचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. ते देताना पणन व कृषी विभागात समन्वय नसल्याने चुकीची माहिती दिल्या गेल्याचे समोर आले आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा चणा खरेदी करण्यासाठी आपण आजच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.