प्रा. गौतमीपुत्र कांबळे; घडलेल्या प्रकाराची प्रशासकीय चौकशी व्हावी
सांगली, ता. ४: गुंठेवारी नियमितीकरण फाईल मंजुरीला दहा-बारा वर्ष विलंब झाल्याने रागाच्या भरात कैलास काळे यांच्याकडून हा प्रकार घडला आहे. त्यांच्या कृतीला समर्थन नाही. मात्र काळे हे गुन्हेगार नाहीत. त्यांना आयुक्तांच्या दालनात अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी जबर मारहाण केली आहे. जसे काळे यांच्यावर गुन्हे दाखल केले, तसे मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अन्यथा चळवळीतील सर्व संघटनांच्यातर्फे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल, असा इशारा सेक्युलर मुव्हमेंटचे प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिला.
तसेच काळे यांच्याकडून घडलेल्या प्रकाराला पालिकेचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे फाईल मंजुरीला विलंब का झाला याची प्रशासकीय चौकशीची मागणी त्यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेपुर्वी चळवळीतील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. सेक्युलर मुव्हमेंटचे भरत शेळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. कांबळे म्हणाले, ‘‘ काळे हे उच्चशिक्षित आहेत. खासगी शिकवणीसह स्पर्धा परीक्षांसाठीही मार्गदर्शन करतात. सेक्युलर मुव्हमेंटचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. अशा माणसाने हे कृत्य का केले असावे, याचा विचार व्हायला हवा. त्यांनी गुंठेवारी नियमितीकरणासाठी फाईल दाखल केली होती. सन २०१२ साली रितसर शुल्क भरले. मात्र बारा वर्षे त्याला मंजुरी मिळाली नाही, तसेच फाईल गहाळही झाली होती. पालिकेतील भ्रष्ट कारभार असल्याने फाईली मंजुरीला वेळ झाला. त्यामुळे त्यांनी आयुक्तांना जाब विचारला. रागाच्या भरात त्यांच्याकडून चुकीचा प्रकार घडला. काळे हे गुन्हेगारी स्वरूपाचे नाहीत. मात्र अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी काळेंना रक्त येईपर्यंत मारहाण केली. आयुक्तांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तत्परता दाखवली. मात्र त्यांच्याच कार्यालयात एका सुज्ञ नागरिकाला जबर मारहाण झाली आहे. त्यामुळे अधिकारी देखील गुन्हेगार आहेत. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल केलेच पाहिजेत.’’
ते म्हणाले,‘‘ ही घटना घडल्यानंतर काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अग्निशमन, कचरा गाड्या रस्त्यावर उभ्या करून नागरिकांची गैरसोय केली. या प्रकरणी देखील कारवाई होणे आवश्यक आहे. वास्तविक ही फाईल अधिकाऱ्यांनी यापूर्वीच मंजूर केली असती तर असा प्रकार घडला नसता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत या प्रकरणाचा निर्णय व्हावा व काळे यांना न्याय मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’’ शिवसेना ठाकरे गटाचे चंदन चव्हाण म्हणाले, ‘‘पालिका क्षेत्रातील अनेक गुंठेवारी प्रकरणे प्रलंबित आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरीची मागणी केली जाते. त्यामुळे अनेक वर्षे फाईली धुळखात पडून आहे.’’
यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, डॉ. नितीन गोंधळे, किरणराज कांबळे, नितीन कांबळे, प्रशिक कांबळे, प्रमोद कुदळे, सुरेश दुधगावकर, सतीश बनसोडे, डॉ. सचिन सव्वाखंडे, सुरेश भंडारे यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.