जबरीच्या गर्भपातानंतरही दुसऱ्यांदा लादले गर्भारपण!
अमरावती: जबरदस्तीने केलेल्या गर्भपातानंतरही फेसबुक फ्रेंडने एका तरूणीवर दुसऱ्यांदा गर्भारपण लादले. १ जानेवारी २०२१ ते २१ एप्रिल २०२३ दरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी २२ एप्रिल रोजी आरोपी आकाश भाऊराव आमदरे (२७, रा. घोडदेव, ता. मोर्शी, जि. अमरावती) याच्याविरूध्द बलात्कार, जबरीने गर्भपात व अॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, जिल्हयातील एका तरूणीची आरोपी आकाशसोबत फेसबुकवर ओळख झाली.
सन २०२१ च्या पुर्वार्धात त्यांच्यात प्रेमबंध निर्माण झाले. दोघांमध्ये सोशल मिडियावर संवाद सुरू झाला. प्रेमाच्या आणाभाका झाल्या. ही पुर्णपणे आपल्या प्रेमाची अॅडिक्ट झाल्याचे लक्षात येताच त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अशी बतावणी करून त्याने त्याच्या चारचाकी वाहनातच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पुन्हा लग्नाचे आमिष दाखवून नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये देखील तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापितक केले. त्यानंतर वारंवार त्याने तिचे सर्वस्व लुटले. त्यातून सन २०२२ मध्ये पिडिताला गर्भधारणा झाली. त्यावेळी आरोपीने कुठलेसे औषध देवून तिचा घरीच गर्भपात घडवून आणला. त्यानंतरही तो पिडिताला भेटत राहिला. तथा त्याने जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून पिडितेला सध्या दोन महिन्यांची गर्भधारणा झाली.
तो मी नव्हेच!
पुन्हा गर्भधारणा झाल्याने पिडिताने आकाशकडे लग्नाबाबत हेका धरला. त्याला वारंवार विचारणा केली. मात्र त्याने तो मी नव्हेचचा पवित्रा घेत नकारघंटा चालविली आहे. त्याने भेटायला येणे देखील टाळले आहे. आरोपी आकाश हा आपल्याला गर्भपातासाठी धमकावत असून ते न केल्यास मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद पिडिताने नांदगाव पेठ पोलिसांत नोंदविली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने २१ रोजी रात्री पोलीस ठाणे गाठले. तथा उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले. पुढील तपास ठाणेदार प्रवीण काळे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.