Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोप पावत चाललेली वाचन संस्कृती; प्रणाली म्हात्रे

लोप पावत चाललेली वाचन संस्कृती; प्रणाली म्हात्रे 


लोप पावत चाललेली वाचन संस्कृती त्यादिवशी मुलाला भाषण लिहून द्यायचं म्हणून पुस्तकांच्या कपाटातील पुस्तके पाहत होते.तर अचानक मला कुणीतरी रडण्याचा भास झाला.आजूबाजूला पाहतेय तर कुणीच दिसेना मग कुणाचा हा केविलवाणा आवाज?तोच माझ्या लक्षात आलं, माझ्या हातातील पुस्तक बोलत होते माझ्याशी.न राहवून मी विचारलं त्याला," काय झालं रे ओक्साबोक्सी रडायला?" तितक्यात ते स्फुंदत स्फुंदत म्हणालं."काय करू रडू नको तर?हल्ली तुला आमच्यासाठी वेळच मिळत नाही.पूर्वी तासनतास आम्हाला हातात घेऊन वाचणारी तू आजकाल ढुंकून ही पाहत नाहीस आमच्या कडे."

"पूर्वी घरात तू सगळे असतानाही, आमच्यात गुंतलेली असायचीच.जणू आम्ही पुस्तकेच तुझे मित्र होतो,नातेवाईक होतो.एकदा हातात घेतल्यावर वेळ काळ न बघता हातातलं पुस्तक संपेपर्यंत सोडत नव्हतीस.जणू आम्ही पुस्तके म्हणजे तुझा जीव की प्राण होतो.मनापासून तुझ्या कपाटात जपायचीस आम्हाला.रेखीव कव्हर घालून नीटनेटकी ठेवायचीस.तुझ्या पुस्तकांना कुणी हातही  लावलेला चालत नव्हता तुला.मग बेबी आताच काय झालं गं?"

"आठवतं तुला तू पाचवीत असताना तुला  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक येण्याबद्दल रणजित देसाई यांची 'स्वामी' ही कादंबरी बक्षिस मिळाली होती,तर तुला केवढा आनंद झाला होता.अजूनही ती कादंबरी तू जपून ठेवली आहेस.त्यानंतर,साने गुरुजी,व.पू. काळे,प्र के.अत्रे,रणजित देसाई,योगिनी जोगळेकर,अशा कैक दिग्गज साहित्यिकांची पुस्तके तू वेड्यासारखी वाचायचीस.तुला आवडलेल्या पुस्तकातील सुंदर विचार, सुवचने डायरीत लिहून ठेवायचीस.रणजित देसाईंचा 'मृत्युंजय' वाचताना रात्रभर हळहळत होतीस,रडली होतीस.या तुझ्या वाचनाच्या वेडा मुळेच तुला नकळत कवितांचं वेड लागलं.लेखनाचं वेड लागलं.तुझ्या स्वलिखित निबंधांना बक्षिसं मिळू लागली.दासबोध,मनाचे श्लोक मुखोद्गत करून तू त्यावर प्रवचन ही करू लागलीस.वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवू लागलीस.केवढे तुझे कौतुक!!शाळेतील शिक्षक,गावातील नागरिक यांची लाडकी देखील झालीस.पण हे सगळे कुणामुळे,?आमच्यामुळेच ना. पुस्तकांमुळे तुला तुझ्या जीवनाचा मार्ग मिळाला.वाचनामुळेच तुझे लेखन समृद्ध होऊ लागले".

"मग बाळे इतके सारे असताना ही तू मात्र या मोबाइलच्या जमान्यात आम्हाला दूर ढकलंलस.पूर्वी एक ही दिवस वाचनात खंड न पडू देणारी तू आता महिनोंमहिने आम्हाला हात ही लावत नाहीस.हीच का किंमत केलीस तू आमची?संपली का ग आपल्यातील ती मैत्री?ते वाचनाचे वेड हरवले का गं मोबाइल मुळे?"

विजेचा झटका लागावा तसं झालं मला.अचानक डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले.खरंच चूक झाली माझी.चूक म्हणावी की अपराध?या मोबाइलच्या युगात पुस्तकांचं वाचन खूपच कमी होऊ लागलंय.अगदी नसल्यात जमा झाल्यासारखे.पूर्वी रविवारच्या सामनातील पुरवणी वाचण्यासाठी धडपडणारी मी,फास्टर फेणे,ठकठक,चांदोबा,सिंहासन बत्तिशी,श्यामची आई अशी अनेक पुस्तके लहान वयात तासनतास वाचताना रमणारी मी.कॉलेज मधे गेल्यावर ही  कॉलेज लायब्ररीतील पुस्तके कमी पडतात की काय म्हणून गावातील लायब्ररीत खाते उघडून दोन दिवसात पुस्तके आणून वाचून सपावणारी,इतका व्यासंग असूनही आज अशी कशी झाले मी?कुठे गेले माझे ते पुस्तकांचे व्यसन.हरवले का या मोबाईलच्या नादात?नाही असं होता कामा नये.कारण याच पुस्तकांनी मला ज्ञान दिले,समज दिली,जीवन जगण्याची कला शिकवली.माझ्यातल्या कलेला पैलू पाडले.त्या माझ्या ग्रंथ-मित्रांना विसरून कसं चालेल. माफ करा पुस्तकांनो  या इंटरनेटच्या जगात खुळावून गेलं होतं मन.या आकर्षित करणाऱ्या सोशल मीडियाच्या नादाने मी तुम्हाला विसरणार नाही. आवर घालेन माझ्या मनाला.पण तुमची साथ सोडणार नाही पुस्तकांनो क्षमा करा मला,इतके दिवस दुर्लक्ष केलं मी तुमच्या कडे पण आता तसं होणार नाही.आपली मैत्री अशीच  कायम राहील अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत!!
         
      * काळजातून देते वचन मी *
      * जपेन तुम्हाला पुस्तकांनो *
      * संस्कारांनी ज्यांनी घडविले मज *
      * माझ्या त्या अनमोल मित्रानो... *

- प्रणाली म्हात्रे.
- विक्रोळी मुंबई

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.