मुख्यमंत्र्यांसह धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करा; उष्माघात प्रकरणी याचिका दाखल
खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहला उष्माघातामुळे झालेल्या 14 श्रीसदस्यांच्या मृत्यूचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. याप्रकरणी अक्षम्य बेफिकीरबद्दल जबाबदार असलेल्या प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुरस्कारप्राप्त अप्पासाहेब धर्माधिकारी यांनाही तितकच जबाबदार धरत त्यांच्यावरही फौजदारी कारवाईची मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे. विरार येथील सामाजिक कार्यकर्ता शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली असून लवकरच यावर सुनावणी होणं अपेक्षित आहे.
16 एप्रिल रोजी खारघरमधील सेंट्रल पार्क इथं झालेल्या या भव्यदिव्य सोहळ्यात लाखोंच्या संख्येनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे श्रीसदस्य जमा झाले होते. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. या सोहळ्याला अंदाजे 20 लाख लोकांनी उपस्थिती लावली होती. यापैकी अनेक जण आदल्या रात्रीपासून तर काही जण एक दिवस आधीच त्या मैदानात दाखल झाले होते.महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रम सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरू होता. प्रचंड उष्माघातामुळे तिथं उपस्थित अनेकांना त्रास झाला. ज्यात 14 जणांचा मृत्य झाला. या घटनेनंतर राज्य सरकारनं संबंधित श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, या दुर्घटनेस जबाबदार कोण? असा सवाल विरोधीपक्षाकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी अंदाजे 14 कोटी रूपये शासनाच्या तिजोरीतून खर्च केल्याचा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात ही जनहित याचिका दाखल झाली असून दोषींवर कारवाई करा या मागणीसह जनतेचा हा पैसा आयोजकांकडून वसूल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.इतक्या मोठ्या संख्येनं लोकं येणं अपेक्षित असताना कार्यक्रमाचं ढिसाळ आयोजन, उन्हापासून संरक्षण देणाऱ्या व्यवस्थेचा अभाव, पाणी, वैद्यकीय सुविधा या दुर्लक्ष हे सारे मुद्दे याचिकेतून उपस्थित केले गेले आहेत. महाराष्ट्र भूषण हा शासकीय पुरस्कार असल्यामुळे जनतेचा पैसा यामध्ये अयोग्य पध्दतीने वापरला असा आरोप याचिकेत केला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये राजकीय फायद्यासाठीच हा सारा घाट घातल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. याशिवाय समोर आलेल्या काही छायाचित्रातून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित श्रीसदस्यांची गैरसोय आणि अडचण झाली होती. तर, दुसऱ्या बाजूला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुरक्षित ठिकाणी वातानुकुलित शामियानात जेवत होती असा आरोपही करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.