बर्फ गोळा खाताय, सावधान!
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांसह मोठ्यांचीही पावले शीतपेय व रसवंतींकडे वळू लागतात. मात्र ही शीतपेये तयार करण्यासाठी जो बर्फ तयार केला जातो, त्याच्या गुणवत्तेबाबत कुणीही शंका घेत नाही. शहरात राजरोस विकल्या जात असलेल्या दूषित बर्फामुळे अनेक जण आजारी पडत असून, अन्न आणि औषध प्रशासनाचे मात्र याकडे काणाडोळा असल्याचे चित्र आहे.
नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात बर्फाचे उत्पादन केले जाते. हा बर्फ दोन प्रकारे बनविला जातो. कच्चा बर्फ आणि पक्का बर्फ. कच्चा बर्फ पारदर्शक नसल्याने तो अत्यंत कमी कालावधीत तयार होतो. त्यामुळे त्याचा भाव कमी असतो. पक्का बर्फ तयार करताना जास्त वेळ लागत असल्याने त्याचा भाव कच्च्या बर्फापेक्षा जास्त असतो.
हा बर्फ पारदर्शक असतो. काही ठिकाणी बर्फाचे क्यूब तयार करून विकल्या जातात. यासाठी वापरण्यात येणारे पाणी शुद्ध असते. सध्या बाजारात येणाऱ्या बर्फाचे उत्पादन बोअरिंगच्या पाण्यापासून केले जात असून, हे पाणी शुद्ध करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे या बर्फापासून आजार बळावत आहेत. कच्चा बर्फाची लादी स्वस्त असल्याने हातगाडीवर आईसगोला विकणारे विक्रेते कच्चा बर्फ खरेदीस प्राधान्य देतात. त्यातून आजार घरात पोहोचण्याची शक्यता आहे.
अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात दूषित पाण्यापासून मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होत असून, तो तयार करताना सरकारी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. जे कारखाने दूषित बर्फ तयार करीत आहेत, त्यांच्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आरोग्यावर होणारे परिणाम
दूषित बर्फात ई-कोलाय विषाणू असल्यामुळे पोटदुखी, डायरिया, गॅस्ट्रो, टायफॉईड, मेंदूज्वर, उलट्या, जुलाब आणि कावीळसारखे आजार होतात. तसेच बर्फाच्या गोळ्यामध्ये असणाऱ्या रंगामुळे पोटाचे विकार व त्वचाविकार वाढण्याचा धोका असतो आणि आतड्यासंबंधी संसर्ग देखील होऊ शकतो.
विशेष काळजी घ्या
घरगुती बर्फाचा वापर करावा शक्यतो बर्फ घातलेले शीतपेय टाळा बर्फ नसलेला उसाचा रस घ्या लग्नसमारंभात बर्फाचे पाणी पिऊ नये.
कोरोनानंतर बऱ्याच लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे. सर्दीमुळे गळा खराब झाल्यास बरे व्हायला पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ लागत आहे. त्यात बाजारात निकृष्ठ दर्जाचा बर्फ वापरण्यात येतो. त्यामुळे वॉटर बॉर्न डिसिज, श्वसन नलिकेचा त्रास तसेच कॉलरासारखे आजार जास्त प्रमाणात होतात.
- डॉ. आशिष कुथे, मानसोपचारतज्ज्ञ.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.