महाराष्ट्रात प्रचंड व्यक्तीद्वेषाचे राजकारण: संभाजीराजे छत्रपती
महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत, हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सांगलीमध्ये सकल मराठा समाजाकडून तरुण भारत स्टेडियमवर भरवण्यात आलेल्या मराठा प्रीमिअर लीग 2023 च्या क्रिकेट सामन्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजेंनी अनेक मुद्द्यावर परखडपणे मत व्यक्त केली. यावेळी मराठा प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झालेल्या टीममधील खेळाडूंशी भेट घेत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व टीमना शुभेच्छा दिल्या.
व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे : संभाजीराजे
'फडतूस' या शब्दावरुन महाराष्ट्रामध्ये सध्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा घसरलेल्या दर्जावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. व्यक्तीद्वेष ठेवून कुणीही राजकारण करु नये. व्यक्तीद्वेष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरंतर विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोललं तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. सत्तेवर असलेल्यांनी किंवा नसलेल्यांनी देखील व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. लोकांना काहीतरी आवडते म्हणून काहीही बोलणं हे टाळलं पाहिजे."
'महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना'
"आज महाराष्ट्र किती अडचणीत आहे हेही बघितलं पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत. हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे," असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली आहे.
'फडतूस' शब्दावरुन राजकारण
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे. या हल्ल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. यावर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस असा केला. उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती 'फडणवीसी' करत आहे, अशा कठोर शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. यावर फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला. तसंच उद्धव ठाकरे यांनी संयमाने बोलावं, असंही सुनावलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.