साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ६० लाख ५० हजारांची फसवणूक
सातारा : उत्तर प्रदेशमधील मुज्जफराबाद येथे २५ बिगा जमीन विकत देतो, असे आमिष दाखवून साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ६० लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पुण्यातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण महादेव जानराव (रा. कोंडवे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदकुमार विनायक फडके (वय ५६, रा. व्यंकटपुरा पेठ, गाेखले हाैदाजवळ, सातारा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यातील एका व्यक्तीने लक्ष्मण जानराव यांची त्यांच्याशी ओळख करून दिली होती. एकेदिवशी जानराव यांनी उत्तर प्रदेशमधील मुज्जफराबाद येथे २५ बिगा जमीन विकायची असल्याचे बांधकाम व्यावसायिक फडके यांना सांगितले. त्यानंतर ती जमीन विकत घ्यायची, असं फडके यांचं ठरलं. त्या जमिनीचा व्यवहारही तब्बल १६ कोटींवर ठरला होता. असं पोलिसांनी सांगितलं. एवढेच नव्हे तर या व्यवहारापोटी सुरुवातीला फडके यांनी जानराव यांना तब्बल ६० लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पाठवले. त्यानंतर त्यांनी जानराव यांच्याकडे जमिनीच्या व्यवहाराच्या कागदपत्रांची मागणी केली. परंतु जानराव यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फडके यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन जानराव यांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.
आणखी तीन ते चार जणांचा समावेश
फसवणूक करणाऱ्यांमध्ये आणखी तीन ते चार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमकी कशा पद्धतीने हे टोळकं फसवणूक करत होतं. हे तपासानंतरच समोर येणार आहे. व्यवहारात दाखवलेली जमीन कागदावर आहे की वास्तव्यात आहे, हे मात्र अद्याप पोलिसांना समजले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.