कर्नाटकमध्ये मतांच्या टक्केवारीत कॉंग्रेसचीच आघाडी
राज्यात २००८ साली भाजपने पहिल्यांदा सत्ता स्थापन केली खरी, पण कर्नाटकात भाजपला आजवर एकदाही स्वबळावर सत्ता मिळविता आलेली नाही. म्हणजे एकाही निवडणुकीत बहुमतासाठी आवश्यक ११३ हा आकडा गाठता आलेला नाही. शिवाय राज्यात सत्ता मिळो वा ना मिळो; पण निवडणुकीत सर्वाधिक मते काँग्रेस पक्षालाच मिळाली आहे. शिवाय सर्वाधिक मते मिळूनही काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.
१९८९ पासूनच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाला मिळालेली मते पाहता नेहमीच कॉंग्रेस वरचढ राहिला आहे. पण बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्याने कॉंग्रेसला सत्ता मिळालेली नाही. १९९४ साली मात्र राज्यात जनता दलाची लाट आली होती. त्यावेळी जनता दलाला कॉंग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली होती. शिवाय राज्यात सत्ताही मिळाली होती. जनता दलात किंवा जनता परिवारात फूट पडल्यामुळे १९९५ नंतर मात्र त्यांचा मतांचा टक्का कमी होत गेला.
त्याचा फायदा काही प्रमाणात भाजपला होत गेला. १९८९ पासून भाजपला राज्यात मिळालेल्या मतांची टक्केवारी वाढत गेली; पण २०१३ साली ती एकदम कमी झाली. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी भाजपविरोधात बंडखोरी केली, नव्या कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. म्हणजे २००८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपला राज्यात ३३.८६ टक्के मते मिळाली होती; पण २०१३ साली केवळ १९.८९ टक्के मते मिळाली. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला ३६.२२ टक्के मते मिळाली.राज्यात सर्वाधिक म्हणजे १०४ जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेसला २०१८ च्या निवडणुकीत कमी म्हणजे ७६ जागा मिळाल्या, पण मतांची टक्केवारी मात्र भाजपपेक्षा जास्त म्हणजे ३८.४ टक्के इतकी होती. १९८९ पासून आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत कॉंग्रेसची मतांची टक्केवारी ही भाजपपेक्षा जास्तच आहे.भाजपने १९८३ साली सर्वप्रथम कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी भाजपने ११० जागा लढविल्या होत्या. १८ मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी भाजपला राज्यात ७.९३ टक्के मते मिळाली होती. १९८५ व १९८९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली. १९८५ साली भाजपने ११६ जागा लढविल्या; पण केवळ दोन आमदार निवडून आले. त्यावेळी भाजपला राज्यात केवळ ३.८८ टक्के मते मिळाली. १९८९ साली ११८ जागा लढवूनही केवळ चार जागा भाजपला जिंकता आल्या.त्यावेळी राज्यात ४.१४ टक्के मते मिळाली. १९९४ साली भाजपला ४० जागा मिळाल्या व १६.९९ टक्के मते मिळाली. १९९९ साली भाजपच्या कामगिरीत सुधारणा झाली. त्यावेळी राज्यातील १४९ जागा लढविल्या व ४४ जागा जिंकल्या. शिवाय मतांची टक्केवारी २०.६९ टक्के झाली. २००४ साली भाजप राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला. भाजपने त्यावेळी १९८ जागा लढविल्या व ७९ आमदार निवडून आणले. मतांची टक्केवारीही २८.३३ पर्यंत पोहोचली. पुढील चार वर्षांनंतर भाजपची कामगिरी आणखी सरस झाली.भाजपने तब्बल ११० जागा जिंकल्या. त्यावेळी भाजपला राज्यात ३६.२२ टक्के मते मिळाली. शिवाय भाजपला पहिल्यांदाच राज्यात सत्ता स्थापनेची संधी मिळाली. कॉंग्रेसला राज्यात सत्तास्थापनेची संधी मिळो ना मिळो पण मतांच्या टक्केवारीत कॉंग्रेस नेहमीच आघाडीवर राहिला आहे. १९८० साली कॉंग्रेसला ४० टक्के मते मिळाली. त्यानंतर १९८३ साली ४०.२२ टक्के, १९८५ साली ४०.८२ टक्के तर १९८९ साली ४३.७६ टक्के मते मिळाली.
१९९९ साली कॉंग्रेस पक्षाला राज्यात तब्बल १३२ जागा मिळाल्या होत्या; पण त्यानंतरच्या म्हणजे २००४ व २००८ च्या निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी खराब झाली होती. २०१३ साली कॉंग्रसने १२२ जागा जिंकून पुन्हा सत्ता स्थापन केली होती. २०१३ ची पुनरावृत्ती कॉंग्रेस करणार का? भाजपच्या मतांची टक्केवारी कॉंग्रेसच्या पुढे जाणार का? हे १३ मे रोजी कळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.