सुप्रीम कोर्टाचा नपुंसक शेरा खरा ठरला
ठाण्यात पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. कासारवडवली येथे ठाकरे गटातील एका महिलेला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे
महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. दरम्यान, खासदार राजन विचारे, केदार दिघे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली.
काय आहे नेमकं प्रकरण :
ठाणे शहरात शिंदे गटाकडून मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव रोशनी शिंदे असून त्या मराठा समाजातील आहेत. त्या टिटवाळा येथे राहतात. रोशनी शिंदे या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवती सेनेसाठी काम करतात. सोमवारी सायंकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटनेची चर्चा सुरू झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत महिलांचा एक गट रोशनी शिंदे यांना घेरून वाद घालताना दिसत आहे. त्यानंतर त्यांना कार्यालयात घेऊन जाताना दिसत आहे.
रोशनी शिंदे यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे?
शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप रोशनी शिंदे यांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत रोशनी शिंदे यांनी म्हटलं आहे की, "टाटा मोटर्स कासारवडवली येथे कामावर असताना ऑफिसमध्ये शिंदे गटाच्या महिलांनी मला शिवीगाळ करून जीवघेणा हल्ला केला. रोशनी शिंदे (रा. टिटवाळा) असे आपणास विनंती करते की, मी टाटा मोटर्स कासारवडवली येथे माझ्या ऑफिसमध्ये कामावर रुजू असताना कामावरून सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी आठ वाजून 25 मिनिटांनी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15 महिलांनी एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करून मारहाण केली.
मारहाण झालेली महिला पदाधिकारी गर्भवती
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजन विचारे म्हणाले, "महाराष्ट्राने गेले नऊ महिने चाललेला हा तमाशा आणि अत्याचार पाहिला असेल. प्रत्येक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एका युवती सेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शोरूममध्ये जात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आली.
खासदार संजय राऊतांची जोरदार टीका :
ठाण्यातील एका ठाकरे गटाच्या निःशस्त्र महिलेवर 100 महिला येऊन हल्ला करतात, ही हिंमत कुणामुळे येते? देवेंद्र फडणवीस हे ठाण्याचे गृहमंत्री आहेत की नाही? ठाण्यात काल घडलेला राडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशावरून झाला, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हा सगळा प्रकार घडत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात, ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी बांगड्या भरल्यात का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केलाय. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ठाण्यातील प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.