अंगणवाडीतील पॅकबंद गव्हाच्या गोदीत मृत उंदीर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अंगणवाडीमधून 9 महियांच्या लाभार्थी बालकास दिलेल्या गव्हाच्या पॉकेटमध्ये चक्क मृत अवस्थेत उंदीर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सिल्लोडच्या धोत्राया गावातील हा प्रकार आहे. त्यामुळे आता संबधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी गरोदर, स्तनदा माता यांच्यासह 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. या सोबतच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना गहू, मूगडाळ, मिरची, हळद, मीठ, चवळी, साखर या साहित्यचे वाटप करण्यात येते. दरम्यान सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथील एका अंगणवाडीमधून पोषण आहारा अंतर्गत मिळणारे धान्य विश्वजीत जाधव यांना देण्यात दिल्यानंतर त्यातील गव्हाच्या पॅकेटमध्ये मेलेला व सडलेला भला मोठा उंदीर दिसला. मेलेला उंदीर पाहून जाधव यांना धक्काच बसला.
मृत उंदीर आढळलेल्या गावाच्या पॅकेटचा पंचनामा
यासंदर्भात विश्वजीत जाधव यांनी अंगणवाडी सेविका आणि गावच्या सरपंच यांना माहिती दिली. तसेच अंगणवाडीत जाऊन इतर आहाराची पाहणी केली. मात्र सुदैवाने इतर आहारात काही निघाले नाही. यावेळी सरपंच आणि ग्रामस्थांनी मृत उंदीर आढळलेल्या गावाच्या पॅकेटचा पंचनामा केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पॅकेट जप्त करून त्याला प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असून, याचा अहवाल आल्यावर दोशींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष...
लहान बालक, गरोदर आणि स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या या पोषण आहारामध्ये अशा प्रकारे उंदीर निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोबतच लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झालाय. तर दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
लहान मुलांच्या जिवाशी खेळ
माहिती मिळताच स्थानिक अंगणवाडी सेविकांनी पंचनामा केला व गव्हाचे पॉकीट सील करीत ताब्यात घेतले. दरम्यान या पोषण आहार पॅकिंग करून पोच करण्याचे कंत्राट एका कंपनीने घेतलेले आहे. राज्यभर या कंपनीकडून पोषण आहार पोच केले जाते. मात्र समोर आलेला प्रकार म्हणजे लहान मुलांच्या जिवाशी खेळ असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.