सांगली: शाळकरी मुलावर रानगव्याचा हल्ला
सांगली: जिवावर बेतलेलं, कपड्यावर निभावलं अशी स्थिती शाळकरी मुलगा आदित्य पाटील याची शनिवारी पुनवत (ता. शिराळा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यावेळी घडली. लोकांच्या गोंगाटाने गव्याने पळ काढला असला तरी नागरिकांनी सावध राहावे अशा सूचना वन विभागाने ग्रामपंचायतीच्या ध्वनी वर्धकावरून नागरिकांना दिल्या.
शनिवारी सकाळी पुनवत येथील तराळकी शिवारात गव्याचे दर्शन नागरिकांना झाले. ही माहिती मिळताच अनेक बघ्यांची गर्दी या ठिकाणी झाली. या गर्दीमुळे बिथरलेल्या गव्याने आदित्य प्रशांत पाटील या मुलावर हल्ला केला. मात्र, गव्याचे शिंग मुलाच्या कपड्यातच अडकले. तरीही गव्याने दिलेल्या हिसड्यामुळे मुलगा दूर जाउन पडला. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही. मात्र, याच वेळी जमलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गव्याने शेतात धूम ठोकली.
हा प्रकार पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर यांनी वन विभागाला तात्काळ कळविला. वन रक्षक प्रकाश पाटील व अन्य कर्मचार्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. दिवसा शेतात काम करीत असताना दक्षता बाळगण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या ध्वनीवर्धकावरून देण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.