सांगली जिल्ह्यातील 'सह्याद्री' कंपनीवर जीएसटीचे छापे
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात असलेल्या सह्याद्री कंपनीवर जीएसटीच्या पथकाने छापे टाकले आहेत. सोमवारपासून जीएसटीचे पथक या कंपनीची कागदपत्रे तपासत असल्याची माहिती आहे. जीएसटी चुकवल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटीचे पथक नेमकी कशाची तपासणी करत आहे याची माहिती मिळू शकली नाही.
मिरज पूर्व भागात शासनाची विविध कामे करणाऱ्या एका कंत्राटदाराची सह्याद्री नावाची कंपनी आहे. सोमवारपासून राज्य जीएसटी विभागाचे कोल्हापूर येथील एक पथक या कंपनीवर छापे टाकून कंपनीची कागदपत्रे तपासत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान या कंपनीची वार्षिक शंभर कोटीहून अधिक उलाढाल असल्याचे सांगण्यात येत आहे.
जीएसटी विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणी या कंपनीवर छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र राज्य जीएसटी विभागाच्या कोल्हापूर येथील कोणत्याही अधिकाऱ्याने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र या कंपनीवर जीएसटी विभागाचे छापे पडल्यानंतर सांगली, मिरजेतील सीए गडबडून गेले आहेत. जीएसटीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच या कंपनीच्या तपासणीचे खरे कारण पुढे येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.