गुलाबजाम घरी नेण्यावरुन लग्न समारंभात हाणामारी
पुणे: विवाह समारंभात शिल्लक राहिलेले गुलाबजाम घरी नेण्यावरुन नातेवाईक मंडळी आणि केटरिंग व्यावसयायिकात हाणामारी झाल्याची घटना हडपसर भागातील शेवाळवाडीत घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केटरिंग व्यावसायिकाकडे काम करणारे व्यवस्थापक दीपांशु गुप्ता ( वय २६ रा. राजयोग मंगल कार्यालय, शेवाळवाडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. हडपसर भागातील शेवाळवाडी येथे राजयोग मंगल कार्यालय आहे. लोखंडे आणि कांबळे परिवारांचा विवाह होता. विवाह समारंभातील जेवणाचे काम गुप्ता यांच्याकडे होते. विवाह समारंभ पार पडल्यानंतर पाहुणे मंडळीचे जेवण झाले.
वर पक्षाकडील एक व्यक्ती मंगल कार्यालयातील भटारखान्यात आली. तेव्हा त्याने राहिलेले जेवण सोबत घेऊन जायचे असल्याचे सांगितले. गुप्ता यांनी काही हरकत नाही, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकाला बोलावून राहिलेले जेवण डब्यामध्ये भरत होते. त्यातील एक जण गुलाबजाम डब्यात भरू लागला. गुलाबजाम तुमचे नाहीत, उद्याच्या विवाह समारंभासाठी गुलाबजाम तयार केलेले आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. या कारणावरुन वरपक्षाकडील नातेवाईकांनी गुप्ता यांच्याशी वाद घातला. गुप्ता यांच्या डोक्यात लोखंडी झारा मारण्यात आला. हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.