कपिल सिब्बल यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान
माझी प्रतिमा मलिन करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून 'सुपारी' दिली आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपानंतर काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ट्विट करून मोदींना आव्हान दिले आहे. तुमची प्रतिमा मलिन करणाऱ्यांची नावे सांगा, आपण त्यांच्यावर खटला चालवू, असे आव्हान सिब्बल यांनी दिले.
मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला होता. काही लोकांनी शपथ घेतली आहे की ते मोदींची प्रतिमा डागाळतील. यासाठी या लोकांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून सुपारी दिली आहे. हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोदींची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आज देशातील गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित मोदींचे सुरक्षा कवच बनले आहेत, असे मोदी म्हणाले होते.
त्याआधी काही दिवसांपूर्वी मोदींनी अशाच प्रकारचे विधान केले होते. माझी कबर खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या विरोधात कटकारस्थाने रचली जात आहेत. लोक मला शिव्या देतात. माझ्या मरणाची प्रार्थना करतात. मला घालून पाडून बोलतात, असे ते म्हणाले होते. यावर आता सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'मोदींचा आरोप आहे की, त्यांची कबर खोदण्यासाठी काही लोकांनी देशात आणि देशाबाहेर काहींशी संगनमत करून 'सुपारी' दिली आहे. अशा व्यक्ती, संस्था आणि कोणत्या देशात तुमच्या बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे त्यांची नावे आम्हाला सांगा. हे गुपित राहू शकत नाही. आपण त्यांच्यावर खटला चालवू.' असे ट्विट सिब्बल यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.