सुषमा अंधारे च्या हल्ल्याने बेजार, शिंदे गटाने शोधला पर्याय
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेना देखील नवा पर्याय शोधला आहे. सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळतील आक्रमक चेहरा, उत्तम निवेदिका, वक्त्या म्हणून सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या ज्योती वाघमारे आता शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर देण्यासाठीच ज्योती वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ठाकरे गटात पक्षाची आक्रमक बाजू मांडण्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अग्रस्थानी होते. ईडीने त्यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटाला राऊत यांच्या सारख्या आक्रमक नेत्याची उणीव ठाकरे गटाला भासत होती. अशावेळी आंबेडकरी चळवळीतील एक चेहरा, वक्त्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली. सुषमा अंधारे यांच्या भाषण शैलीने राऊत यांची उणीव काही प्रमाणात भरून काढण्यात आली. आपल्या खास शैलीत अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या आमदारांवर टीका सुरू केली होती. अंधारे यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर प्रहार होत असल्याने त्याची जोरदार चर्चा होत असे.
सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंबेडकरी चळवळतील आक्रमक चेहरा, उत्तम वक्त्या असलेल्या प्रा. ज्योती वाघमारे यांची राज्य प्रवक्ता म्हणून निवड केली. या निवडीनंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणाऱ्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला.
कोण आहेत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे?
सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. शैलीदार निवेदिका, फरड्या वक्त्या म्हणून परिचित आहेत. त्यांची मातृभाषा तेलगू असून इंग्रजी भाषेत पीएचडी, आणि मराठीवर प्रभुत्व असल्याने वक्तृत्वाने मंच गाजवण्यात कुशल आहेत. मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतीक चळवळ, आंबेडकरी चळवळ इत्यादी माध्यमातून त्या राजकीय-सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. प्रा. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं. ज्योती वाघमारे यांनी देखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं. पण नंतर राजकारणापासून अलिप्त झाल्या. त्यानंतर आता राजकारणापासून अलिप्त झालेल्या ज्योती वाघमारे यांनी पुन्हा एकदा राजकारणात एंट्री केली. शिवसेनेच्या राज्याच्या प्रवक्ता म्हणून त्यांनी राजकारणात पुनरागमन केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.