Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल ह्या नंबरसाठी मोजले 4 कोटी 31 लाख 56 हजार 500 रुपये

तब्बल ह्या नंबरसाठी मोजले 4 कोटी 31 लाख 56 हजार 500 रुपये


नागपूर: गाड्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी 'चॉइस' नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्यांची संख्यादेखील झपाट्याने वाढली. २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये नागपूर जिल्ह्यात यात दुप्पटीने वाढ झाली. या 'व्हीआयपी' नंबरसाठी तब्बल ४ कोटी ३१ लाख ५६ हजार ५०० रुपये मोजले. हौसेला मोल नसल्याचे यातून दिसून येते.

गाडीपेक्षा आपल्या गाडीचा नंबर दुसऱ्यांचे लक्ष कसे वेधून घेईल याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा 'व्हीआयपी'नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा अनेकांचा समज असतो. या आकर्षक नंबरची 'क्रेझ' वाढताना दिसून येत आहे. २०२१-२२ या वर्षांत नागपूर शहर व नागपूर ग्रामीण आरटीओला 'व्हीआयपी'नंबर मधून २ कोटी ७३ लाख ८६ हजार ५०० रुपये तर, २०२२-२३ या वर्षांत ४ कोटी ३१ लाख ५६ हजार ५०० रुपयांची कमाई झाली.

* ४ लाखांचा ०००१ नंबरला मिळाले तीन ग्राहक

पूर्वी '०००१' नंबर हा १ रुपयात मिळायचा. २०१३ मध्ये 'व्हीआयपी' नंबरच्या शुल्कात वाढ करण्यात आल्याने हा नंबर ४ लाखांचा झाला. २०२१-२२ या वर्षापर्यंत या नंबरला ग्राहक नव्हते. परंतु २०२२-२३ या वर्षात नागपूर शहर आरटीओला एक तर नागपूर ग्रामीण आरटीओला दोन असे तीन ग्राहक मिळाले. यातून १२ लाखांचा महसूल मिळाला.

* ५० हजारांच्या नंबरला सर्वाधिक पसंती

नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयातून गेलेल्या महागड्या चॉइस नंबरमधून ५० हजारांच्या नंबरला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले. नागपूर शहर आरटीओ कार्यालयातून मागील दोन वर्षांत ५३, तर नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातून १९ नंबर गेले आहेत.

* शहरासोबतच ग्रामीणमध्येही व्हीआयपीचे 'फॅड'

नागपूर ग्रामीण आरटीओला मागील दोन वर्षांत व्हीआयपी नंबरमधून ३ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपयांची, तर नागपूर शहर आरटीओला दोन वर्षांत ३ कोटी ७१ लाख ८५ हजार रुपयांची कमाई झाली. शहरासोबतच ग्रामीणमध्येही व्हीआयपीचे 'फॅड' असल्याचे दिसून येते.

* आवडीचा नंबर मिळतो कसा?

आवडीचा नंबर पाहण्याची सोय ॲनलाइन आहे. मात्र, नंबर बुक करण्यासाठी संबंधित आरटीओ कार्यालयात जावे लागते. येथे एक अर्ज करून पैसे भरल्यास तुमच्या वाहनावर नंबर चढतो.

* चॉइस नंबरसाठी लोकांचा कल वाढतोय 

आरटीओला मिळालेला महसूल पाहता चॉइस नंबर घेण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसून येत आहे. मात्र, कार्यालयात येऊनच आवडता नंबर बुक करावा, दलालांची मदत घेऊ नये.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.