पाच लाखांच्या बदल्यात 30 लाख देणार; तोतया आमदाराला पुण्यात अटक
पुणे : आपण उत्तर प्रदेश राज्यातील मंत्री असल्याचे भासवून पुण्यातील एका व्यावसायिकाला पाच लाखांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखविले. मात्र पाच लाख घेऊनही बनावट नोटा न देता त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर दाखल गुन्ह्यानुसार वानवडी पोलिसांनी तोतया आमदारासह बनावट नोटांचे आमिष दाखवून फसविणाऱ्या टोळीला गुरुवारी (ता. २७) रात्री अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खराडी येथील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती.
राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (चौघे रा. निलंगा, जि. लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फिर्यादीच्या मदतीने सापळा रचून नाशिक फाटा येथे रुपाली राऊत, संजयकुमार पांडे आणि विकासकुमार रावत यांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे. तसेच, किती लोकांची फसवणूक केली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील ५४ वर्षीय व्यावसायिकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खराडी बायपास येथे फिर्यादीची रुपाली नावाच्या महिलेसोबत ओळख झाली होती. त्या महिलेने आपण उत्तरप्रदेश राज्याच्या मंत्री असल्याचे भासविले. तसेच तीनपट पैसे मिळवून देण्याची योजना फिर्यादीस सांगितली.तिने आरोपी पांडे हा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार असल्याचे सांगून फिर्यादीचे बोलणे करून दिले. तसेच पाच लाख रुपये दिल्यास बनवाट ३० लाख रुपये मिळतील, असे सांगितले. आरोपीने सांगितलेली योजना फिर्यादीला आवडली. त्यानुसार ते ३० मार्च रोजी एसआरपीएफ ग्रुप परमारनगर येथे इतर आरोपींना भेटले. त्यावेळी पांडे याने साथीदारांसोबत येऊन रसायनांचा वापर करून बनावट नोटा तयार करण्याचे प्रात्यक्षिकच फिर्यादीला दाखविले.
या प्रात्यक्षिकानंतर फिर्यादीचा आरोपींच्या योजनेवर विश्वास बसला. त्यानंतर व्यावसायिकाने आरोपींना ५ लाख ३४ हजार रुपये दिले. पाच लाख रुपये देऊनही आरोपींनी व्यावसायिकास ३० लाख रुपये दिले नाहीत. त्यानंतर फिर्यादीने त्यांना दिलेले पाच लाख ३४ हजार रुपये परत मागितले. त्यावर आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.