सांगलीत 100 फूटी रोडवरील हॉटेल मध्ये राडा
सांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावर हॉटेल एसएसमध्ये दारू पिण्यास व जेवणासाठी गेलेल्या टोळक्याने नंग्या तलवारी नाचवत व चाकूने दाखवत प्रचंड दहशत माजविली. बिअरच्या मोकळ्या बाटल्या टेबलावर फोडल्या. गार्डनचे पार्टीशन तोडले. काऊंटरवरील साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी ११ जणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश हात्तीकर, ओम पाटील, भारत आदमाने, विशाल ननवरे, ऋषिकेश कांबळे, समीर, रवि (पूर्ण नावे निष्पन्न नाहीत) व अनोळखी चार संशयितांचा समावेश आहे. शंभरफुटी रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ हॉटेल एसएस आहे. संशयित या हॉटेलमध्ये दारू पिण्यास व जेवण करण्यासाठी गेले होते. दारू पिऊन व जेवण झाल्यानंतर अचानक त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यातून त्यांच्यात दोन गट निर्माण झाले. ते जोरजोरात एकमेकांना शिवीगाळ करू लागले.
नंग्या तलवारी व चाकू काढून त्या हवेत नाचवून प्रचंड दहशत निर्माण केली. गणेश हात्तीकर याच्याजवळ तलवार, तर ओम पाटीलच्या हातात चाकू होता. तलवार व चाकूच्या धाकाने त्यांनी समोरील गटाला शिवीगाळ करून धमकी दिली. विशाल ननवरे याने बिअरच्या मोकळ्या बाटल्या घेऊन त्या टेबलवर फोडल्या. अनोळखी चार संशयितांनी शिवीगाळ करीत धमकावित हॉटेलमधील गार्डनचे पार्टीशन तोडले.
काऊंटरवर जावून साहित्याची तोडफोड केली. जेवण व दारू पिल्याचे बिल देत असताना तलवार व चाकू हवेत फिरवत निघून गेले. पोलिसांनी या प्रकरणात दोन साक्षीदार तपासले आहेत. संशयितांना अजून अटक केलेली नाही. घटनेपासून ते गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत व्यवस्थापक शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.