कृष्णा नदी बचावासाठी सांगलीत मानवी साखळी आंदोलन
प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या कृष्णा नदीच्या बचावासाठी आज सांगलीमध्ये मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. मानवी साखळी आंदोलनात सांगली शहरासह नदीलगतच्या गावातील विविध सामाजिक संघटना तसेच पर्यावरण प्रेमी संघटना सहभागी झाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे उमेश पाटीलही या मानवी साखळी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर या दोघांनी एकत्र येत चहा घेतला आणि अनेक विषयावर चर्चा झाली. यावेळी कृष्णामाईच्या बचावासाठी पंचसूत्री घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
साखर कारखान्यांकडून होत असलेले प्रदूषण कृष्णा नदीच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे नदीसह नदीकाठचा गावांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गेल्या महिनाभरात नदीत लाखो माशांनी तडफडून जीव सोडला आहे. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याने माशांचा तडफडून मरत आहेत. त्यामुळे पिण्याचा पाण्याचाही प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीकर जनता रस्त्यावर उतरली.
कृष्णा नदी दक्षिण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून तिचा 1400 पैकी 282 किमीचा प्रवास महाराष्ट्रातून होतो. राज्यातून वाहणारी नदी प्रदुषणाच्या विळख्यात अडकली आहे. सांगली शहर महापालिका; कराड, इस्लामपूर आणि आष्टा या तीन नगरपालिका आणि 29 मोठ्या ग्रामपंचायतींचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत सोडले जाते. इस्लामपूर, पलूस औद्योगिक वसाहतीचे सांडपाणीही कृष्णेतच मिसळते. नदीकाठच्या साखर कारखान्यांचे पाणी, मळी चोरून नदीत सोडली जाते, असे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
राजू शेट्टींकडून याचिका दाखल
दरम्यान, कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पोहोचले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अॅड. असिम सरोदे यांच्या मदतीने 13 मार्च रोजी याचिका दाखल केली आहे. पर्यावरणहित याचिकेत साखर कारखाना, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही प्रतिवादी केला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या याचिकेत अॅड. असिम सरोदे यांच्यासह अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी, अॅड. सुघांशी रोपिया न्यायालयीन काम बघत आहेत. अॅड. गौतम रमाकांत कुलकर्णी हे स्वतः सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांना कृष्णा नदीतील प्रदूषणाचा हा जुना विषय पूर्ण माहिती आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.