संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात असा प्रस्ताव भाजपच्या विचाराधीन असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, भाजपला निवडणुका जिंकता याव्यात, भाजपला सत्ता मिळवता यावी यापलिकडे त्यांचा विचार जात नाही. कोणत्याही निवडणुका एकत्र घेतल्यास आम्ही तयार आहोत. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, ' मुंबईसह महाराष्ट्रातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका का रखडवून ठेवल्या आहे? भाजपचं एकच धोरण आहे सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता. त्यासाठी अडाणी, नीरव मोदी, मेहुल चोक्सीला पाठीशी घालायचं. या धोरणानुसार राज्य चाललं असेल तर निवडणुका आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. तुम्ही निवडणुका कधीही घ्या आम्ही तयार आहोत. '
राऊत हे पुढे म्हणाले की, 'देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या इतिहासात कधी घडलेल्या नाहीत. या देशातील एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संपूर्ण भाजप हा कसा कामाला लागला आहे हे इतिहासात कधी घडलं नव्हतं. इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं की बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही फक्त भाजपला कोणालातरी विकत द्यायची आहे म्हणून तिचा फार मोठा सौदा केला जातो. निवडणूक आयोगाचाही वापर करून एका फुटलेल्या गटाच्या हाती शिवसेना दिली जाते, हे सुद्धा इतिहासात कधी घडलं नव्हतं. देशाच्या लोकशाहीवर टीका केली, लोकशाही संपली किंवा संपतेय अशी टीका केली म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्याची लोकसभेतील किंवा संसदेतील सदस्यता रद्द करावी अशी मागणी देशाच्या इतिहासात कधी केली गेली नाही.
संजय राऊत यांनी एका पारधी कुटुंबातील मुलीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेला ट्विट करत वाचा फोडली होती. या ट्विटनंतर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की , या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल मी ट्विट केल्याने जर माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर राज्यातल्या कायदा कोणत्या पद्धतीने काम करत आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन करायची , चुंबन प्रकरणाच्या एका व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते . पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचा फोटो ट्विट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून एका खासदारावर, पत्रकारावर गुन्हा दाखल होतो ही या राज्याची कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर कशी नाचते आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, माझ्याविरूद्धच्या हक्कभंग समितीमध्ये तक्रारदारच न्यायाधीशाच्या भुमिकेत आहेत. ज्या व्यक्तीविरोधात आपण भ्रष्टाचाराचे पुरावे दिसे आहेत ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. शिंदे गटाच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे ते हक्कभंग समितीचे सदस्य आहेत. हे सगळं ठरवून झालं आहे. यामुळे इथे न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. मी संपूर्ण विधीमंडळाला कधीही चोरमंडळ म्हटलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.