Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर तसेच स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार हर्षित अभिराज यांना जाहीर

स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर तसेच स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार हर्षित अभिराज यांना जाहीर


(यावर्षीचा पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी बहाल - सुरेश पाटील) 

सांगली :  श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट, सांगली यांचेवतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार २०२३’ यावर्षी पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पुणे यांना हिंदुस्तानी शास्त्रीय गायन क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल दिला जाणारा असून, जनसेवा पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. 

तसेच ‘स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार २०२३’ सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि गीतकार हर्षित अभिराज, मुंबई यांना संगीत क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा असून, पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. यंदाचा ३२ वा पुरस्कार वितरण सोहळा स्व. नेमगोंडा दादा पाटील यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्त पद्मश्री, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार व अभिनेते शेखर सेन, पुणे यांच्या शुभहस्ते व श्रीपाद चितळे, संचालक सुरश्री संगीत फाउंडेशन, सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमती भवन, नेमिनाथनगर, सांगली येथे मंगळवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी दु. ४ वा. दिला जाणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी दिली.

ते म्हणाले २०२३ सालच्या ‘स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा’  पुरस्काराचे मानकरी असलेले पंडित उल्हास कशाळकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक असून, ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायन पद्धतींवर हुकूमत असणारे गवई आहेत. त्यांनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले आपले वडील नागेश दत्तात्रय कशाळकर यांच्याकडे घेतले. नागपूर विद्यापीठातून त्यांनी संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. नंतर त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताभ्यास केला. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रय विष्णू पलुसकर तथा बापूराव पलूसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. त्यांनी आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात १९८३ ते १९९० दरम्यान काम केले. यापूर्वी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार तसेच संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत. त्यामध्ये सांगलीच्या शास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी आहेत. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीतमहोत्सवात सहभाग घेतला आहे. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा ‘स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात येत आहे. 

 तसेच स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्कार २०२३ चे मानकरी असलेले हर्षित अभिराज हे मराठी भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार असून त्यांनी मराठी, हिंदी या भाषांमध्ये अनेक अल्बमना संगीत दिले आहे. त्यांनी हिंदी, मराठी, संस्कृत, पाली (अर्धमागधी), रशियन इत्यादी विविध भाषांमध्ये १५ चित्रपट, १६ अल्बम आणि ६५० हून अधिक स्टेज शोज भारतात आणि परदेशांमध्ये केले आहेत. दूरच्या रानात, लिंबोणीचा लिंबू, बाप्पा मोरया, श्रावण महिना, जगण्याला पंख फुटले, माझी मुलगी, सोडा राया नाद खुळा, ओम नमो भगवते, आप हमारे सर अब्दुल कलाम, मेरे प्यारे किशन कन्हैया, लहरत लहरत ही त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत. हरिहरन, एस. पी. बालसुब्रमण्यम, अनुराधा पौडवाल, कैलाश खेर, जावेद अली आणि सुरेश वाडकर प्रसिद्ध अभिनेते जॉकी श्रॉफ त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या गाण्यासाठी युट्युब वर १६ कोटीहून अधिक व्हीयूज आहेत. प्रसिद्ध गायक डॉ. एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या टॉप ५१ गाण्यात हर्षितनी स्वरबध्द केलेल्या गजलकार इलाहि जमादार लिखीत "लहरत लहरत" या गीताचा समावेश आहे. जैन संस्कृती मधील प्रसिद्ध गीत "महोत्सव जैन धर्म का" या गीताचे हर्षित अभिराज हे गायक आणि संगीतकार आहेत. अनेक इच्छुकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन गायन कार्यशाळा घेतात. ते मधुर रचनांसाठी ओळखले जातात. आणि सुवर्णकाळातील अनेक संगीतकाराकडून प्रेरित आहेत. ज्यामध्ये शंकर जय किशन, एस. डी. बर्मन, सोनू निगम, ओ.पी. नय्यर, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नदीम श्रवण, आनंद मिलिंद यांचा समावेश आहे. त्यांचे आगामी मराठी चित्रपट रौंदळ, भ्रमणध्वनी, विठ्ठला तूच, सर्जा आणि श्रीराम स्तुती यांना संगीत दिले आहे. तसेच सुपरहिट चित्रपट ‘बबन’ साठीही संगीत दिले आहेत. हर्षित अभिराज यांनी पर्यावरण, बेटी बचाओ, योग दिवस, एक दिया कोरोना योद्धाओंके लिए, व्हीजन इंडिया २०२० इत्यादीसाठी संगीत दिले आहे.  त्यांना अखिल भारतीय साहित्य परिषदेचा महात्मा फुले संगीतरत्न पुरस्कार, उत्कृष्ट संगीतासाठी चित्र परिवाराचा पुरस्कार, अभिजीत दादा कदम फाउंडेशनचा विशेष गीतकार आणि संगीतकार पुरस्कार, राजेश खन्ना स्मृती पुरस्कार, राजा गोसावी स्मृती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा २०२३  प्रदान करण्यात येत आहे.

त्याचबरोबर या पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून समाजसुधारणांच्या क्षेत्रात पायाभूत मांडणी करणारे आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याची रचना करणारे जेष्ठ समाजसेवक, श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट सांगलीचे तात्कालीन मॅनेजिंग ट्रस्टी, कुपर कॉर्पोरेशन प्रा. लि. सातारा, वालचंद नगर इंडस्ट्रीज, कमिन्स इंडिया प्रा. लि. येथील व्हाईस प्रेसिडेंट तसेच लठठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निग कौन्सिल मेंबर म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले स्व. जे. बी. पाटील यांना वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांनी संपूर्ण हयातीत अनेक दर्जेदार पुस्तकांची खरेदी करून, वाचन करून संग्रही ठेवली व स्वतःचे ग्रंथालय तयार केले. त्यांची इच्छा होती की मरणोप्रांत संग्रही असलेले पुस्तके चांगले काम करणाऱ्या ग्रंथालयांना भेट म्हणून दिली जावीत. त्यांचे चिरंजीव व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट सांगलीचे मॅनेजिंग ट्रस्टी तशी सुदर्शन पाटील ही इच्छा पूर्णत्वास नेत आहेत. त्यांची जवळपास १ लाखाहून अधिक किमतीची पुस्तके सांगली जिल्हा कारागृह येथील बंदी सुधारणा केंद्र, राजमती सार्वजनिक ग्रंथालय, संवेदना वृद्धसेवा केंद्र, श्रीमती इंदिरा बाबगोंडा विकास ग्रंथालय जी. ए. कॉलेज, एन.एस.लॉ. कॉलेज, एन.डी.पाटील नाईट कॉलेज, कस्तुरबा वॉलचंद कॉलेज, ए.बी.पाटील इंग्लिश स्कूल या शैक्षणिक व सामाजिक संस्थांना देणगी स्वरुपात देण्यात येणार आहे. 

या ट्रस्टच्यावतीने यापूर्वी स्व. नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यामध्ये क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, शांतीलालजी मुथा, श्रीमती मेधा पाटकर, डॉ. डि.के. गोसावी, आण्णासो हजारे, आर. के. लक्ष्मण, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. विलास संगवे, प्रा. रा.ग. जाधव, राजेंद्रसिंह राणा, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, प्रा. म. द. हातकणंगलेकर, संजय नहार, सुरेश खोपडे, लक्ष्मीकांत देशमुख, ऍड. बस्तू रेगे, श्रीमती चेतना सिन्हा, डॉ. तात्याराव लहाने, सुरेश खानापूरकर, राजू शेट्टी, डॉ. अभय बंग, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. संजय ओक, तसेच स्व. राजमती नेमगोंडा पाटील विशेषसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्यामध्ये विदुलता शहा, डॉ. लीला पाटील, संगीता झाडबुके, स्वा. सैनिक राजमती बिरनाळे, मेहरूनिस्सा दलवाई, उषा मेहता, विद्या बाळ, प्रा. रेवती हातकणंगलेकर, डॉ. एस. ए. मंटगणी, बाळ पळसुले, संजीव माने, डॉ. माधुरी पाटील, विजयाताई लवाटे, सुश्री आचार्या चंदनाजी, नसीमा  हुजरूक, मनीषा म्हैसकर, विलास शिंदे, श्रीमती उषादेवी पाटील या मान्यवरांचा समावेश आहे.  यावेळी राजमती ट्रस्टचे ट्रस्टी प्रमोद पाटील, प्रीतम चौगुले हे उपस्थित होते. सदर सत्कार समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी यावेळी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.